शैक्षणिक धोरण
शैक्षणिक धोरण
मुख्य बातम्या

नव्या शैक्षणिक धोरणावर मुख्याध्यापक म्हणतात...

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

नव्या शैक्षणिक धोरणाला नुकतीच केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. यात विशेष म्हणजे दहावी-बारावीच्या बोर्डाचे महत्त्व कमी करण्यात आले आहे.

तीन वर्षे वयोगटापासून १८ वर्षांपर्यंतची मुले आता ‘शिक्षणाचा अधिकार’ या कायद्याच्या कक्षेत येतील. इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाईल.

नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित ५ + ३+ ३ + ४ असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना असणार आहे.

हे शैक्षणिक धाेरण कसे आहे? सकारात्मक बदल काय आहेत? त्याची अंमलबजावणी याबाबत शहरातील विविध शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशातील शैक्षणिक धोरणात ३४ वर्षानंतर अमुलाग्र बदल झाला असून ही बाब स्वागतार्ह आहे. इयत्ता पाचवी पासूनच मातृभाषेतून शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व मूलभूत संकल्पना विकसित होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळेल. इयत्ता सहावी पासूनच व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होणार असल्याने विद्यार्थ्याना स्वतः मधील कौशल्य ओळखण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण, उच्च शिक्षणात कृषी, कायदा, वैद्यकीय, तांत्रिक शिक्षण यामुळे विद्यार्थी आपल्यातील कौशल्य क्षमता व गुण ओळखून योग्य दिशेने वाटचाल करतील. मुख्यत्वे यातील मूल्यमापन हे उपयोजनात्मक असल्याने योग्य असे मूल्यमापन विद्यार्थ्यांचे होईल असे वाटते.

किशाेर पलखेडकर, मुख्याध्यापक, नवरचना माध्यमिक विद्यालय, नाशिक

नवीन शैक्षणिक धाेरण सुरूवातीला असेच हाेते. मधल्या कालखंडात त्य्त काही बदल केले गेले. परत आता त्याच स्थितीत हे धाेरण आणले आहे. एक सकारात्मक दृष्टिकाेन चांगलाच आहे. यामुळे विद्यार्थाला नक्कीच वाव मिळेल. पूर्वी दहावीपर्यंत विद्यार्थाला आवड निवड नव्हती. दहावीनंतरच हाेती. आता नववीपासूनच विद्यार्थाला आपली आवड व निवड करता येणार आहे. केंद्र शासनाचे अभिनंदन, राज्यशासनाने लवकरच याबाबत अंमलबजावणी करावी.

गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल, नाशिक

पूर्वी माॅन्टेसरी विभाग हा अधिकृत पकडण्यात अाला नव्हता. ३ वर्षांपासून हे धाेरण राबविले जात आहे. माॅन्टेसरीचे आता ३ ते ४ आणि चार ते पाच एैच्छिक ठेवले आहे. उर्वरित एक वर्ष जे आहे, त्याचा अभ्यासक्रम शासन बनविणार आहे. त्यामुळे माॅन्टेसरीला अधिकृत दर्जा देण्यात अाला आहे. अनेक वर्षांपासून संघटनांची ही मागणी हाेती. मातृभाषेतून शिक्षण ही बाब स्वागतार्ह आहे. चांगला बदल आहे.

राजेंद्र निकम, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ तथा मुख्याध्यापक, सागरमल माेदी विद्यालय

नव्या शैक्षणिक धाेरणातील मुख्य बाब म्हणजे मातृभाषेत पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण दिले जाईल. बहुतेक शिक्षक इंग्रजी बोलण्यात उत्कृष्ट असतात किंवा नसतात. परंतु यामुळे शिक्षकांना त्यांच्या मातृभाषेत विद्यार्थांना स्पष्टीकरण देणे देखील उपयुक्त ठरणार आहे. जीवनातील प्रत्येक बाबतीत विश्लेषणात्मक क्षमता महत्वाची असून यासाेबतच शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षक व पालक यांचे विचार बदलणे गरजेचे आहे. बहु-शिस्तीचा दृष्टीकोन कसा स्वीकारला जाताे, आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

डॉ. स्वामिनी वाघ, प्राचार्य, बॉईज टाऊन पब्लिक स्कूल, नाशिक.

विद्यार्थांना अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य असेल. मातृभाषेतून शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर हाेतील. सारखाच अभ्यासक्रम असल्याने कुठेही तफावत वा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा हाेणार नाही. विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागणार नाही. पालकांना शाळा निवडीचे स्वातंत्र्य असेल. अभ्यासक्रम, शाळा सारख्याच असतात. सर्व शिक्षक तेच शिकवितात. पालकांनीही समजणे गरजेचे आहे.

मिनाक्षी गायधनी, मुख्याध्यापक, अभिनव बाल विकास मंदिर, नाशिक.

Deshdoot
www.deshdoot.com