Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याऑनलाईन शिक्षणाची डोकेदुखी; मुख्याध्यापकाकडूनच व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील पोस्ट

ऑनलाईन शिक्षणाची डोकेदुखी; मुख्याध्यापकाकडूनच व्हॉटस्अ‍ॅपवर अश्लील पोस्ट

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले नंबर 1 या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने तिसरीच्या वर्ग शिक्षिकेने बनवलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर लज्जा उप्तन्न होईल अशी अश्लील पोस्ट टाकली असून या ग्रुपवर महिला शिक्षिकांंसह पालक व विद्यार्थी असल्याचेही भान ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्षपद भूषवणार्‍या या मुख्याध्यापकाला राहिले नाही.

- Advertisement -

जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या ग्रुपवरही हा मेसेज टाकण्यात आला असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणार्‍या या मुख्याध्यापकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालकांसह शिक्षकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी बनवलेल्या या ग्रुपमध्ये टाकलेला हा मेसेज या मुख्याध्यापकाने जिल्हा पातळीवरील ग्रेडपात्र मुख्याध्यापकांच्याही ग्रुपवर चार दिवसांपूर्वी बिनदिक्कतपणे टाकला असून मुख्याध्याक पदाला न शोभणारी बाब केल्यानंतरही माफी मागण्याचे अथवा चूक झाली असे म्हणण्याचे सौजन्यही त्याने दाखवलेले नाही.

या ग्रुपवरील मुख्याध्यापकांनी केवळ ग्रुपवरच निषेध व्यक्त करत एवढ्या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक संघटनेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांना ही पोस्ट टाकून तक्रार केली असल्याचे समजते. काही शिक्षिकांनी व पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली असल्याचे समजते. काही पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला जाब विचारल्याचेही समजते.

पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्यांना लज्जा उप्तन्न होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल, अशोभनीय वर्तन केल्याबद्दल या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे.

मुख्याध्यापक सक्तीच्या रजेवर

सदर घटनेबाबत काही पालकांनी तोंडी तक्रार केली होती. त्यानुसार आज शाळेत जाऊन सर्व शिक्षकांची भेट घेतली. काही पालकही आले होते. या पालकांसमोर मुख्याध्यापकाने झाल्या प्रकाराबाबत माफीही मागितली. मात्र त्यातून कुणाचेही समाधान झाले नाही. सर्व शिक्षकांचे म्हणणे लिहून घेतले असून या मुख्याध्यापकाला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मंजुषा साळुंके, प्रभारी गटशिक्षणाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या