
कोल्हापूर | Kolhapur
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या (ED) रडारवर असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढत आहेत. दीड महिन्यांपूर्वी मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा (Raid) टाकला असून त्यांच्या समर्थकांनी घराबाहेर गर्दी केली आहे....
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ ते ६ वाजेच्या सुमारास सात ते आठ अधिकारी तीन वाहनांतून मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरात जाऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.
याआधी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी 'ईडी'च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त (confiscation) केली होती. त्यानंतर आज ईडीने मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी छापा टाकला. तर मुश्रीफ यांच्या घराबाहेर पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने (Wife) प्रतिक्रिया दिली असून त्यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मुश्रीफ यांच्या पत्नी म्हणाल्या की, किती वेळा यायचं या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायचं तरी काय, यांना आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा, असे त्यांनी म्हटले.