५० थर लावून हंडी फोडली - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उत्सव मंडळांना भेट
५० थर लावून हंडी फोडली - मुख्यमंत्री शिंदे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोना संसर्गाची भीती दूर झाल्यानंतर दोन वर्षांनी शुक्रवारी साजऱ्या होत झालेल्या दहीहंडी उत्सवात मुंबई, ठाण्यात गोविंद पथकांनी अभूतपूर्व सहभाग नोंदवत सलामी दिली. गोविंदा पथकांवर बक्षिसे जाहीर केली गेली.

मुंबई, ठाण्यातील दहीहंडी उत्सवात आज भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा आज जास्त बोलबाला होता.आज भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळीतील जांबोरी मैदानावर दहीहंडी उत्सव आयोजित केला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडी उत्सवाला भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आम्ही सुद्धा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असून सर्वसामान्य मुंबईकरांना दूध, दही देणार असल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला.

५० थर लावून हंडी फोडली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी आपण ५० थर लावून मोठी हंडी फोडली. आता हे थर आणखी वाढतील, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील आणखी काही आमदार आपल्याला समर्थन देतील, असे संकेत दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिवंगत आनंद दिघे यांची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाला भेट देऊन गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, आपले सरकार शेतकरी, कामगार यांच्यासह गोविंदाचेही आहे. त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते ना! पण, मला आज ही मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत नाही. मी तुमच्यातील एक आहे, असेही त्यांनी सांगितले.

गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, गोविंदासाठी दहा लाखांचा विमा, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी आपण पूर्ण केली असून पुढील वर्षी प्रो गोविंदा सुरू होईल, असे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. उत्सव जल्लोषात साजरा करताना काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप आणि शिंदे गटाची छाप

मुंबई ठाण्यात दहीहंडी, गणेशोत्सव मंडळांवर शिवसेनेचा प्रभाव आहे. हा प्रभाव पुसून आपली छाप पाडण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने प्रयत्न चालवले आहेत. शिंदे सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन तरुण गोविंदाना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीमुळे प्रसिद्धी झोतात आलेले भाजप आमदार राम कदम, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रताप सरनाईक यांनी आज भव्य स्वरूपात दहीहंडी आयोजित केली होती. यावेळी बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावून तसेच आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दहीहंडी उत्सवाला भेटीगाठी

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई, ठाण्यातील विविध दहीहंडी उत्सवाना भेटी दिल्या. एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे, बोरिवली येथील उत्सवाला भेट दिली. याशिवाय मीरा भाईंदर, भिवंडी, ठाण्यातील वर्तकनगर, किसननगर, रघुनाथ नगर येथील दहीहंडी उत्सवाला शिंदे यांनी उपस्थिती लावली. तर देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव, घाटकोपर, बोरीवली, दहिसर येथील दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com