
जामनेर jamner -प्रतिनिधी
शहरातील ओम शांती नगर येथील नितीन सुरेशचंद्रजी सुराणा याचे राहते घरातून स्थानिक गुन्हे शाखा (local crime branch) जळगाव येथील पोलीस पथकाने धाड टाकून विमल गुटख्याची (Gutkha) सात पोती जप्त (seized)केली असून सुमारे 2 लाख 95 हजार 768 रुपयाचा विमल गुटखा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कार्यवाही केली असून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना जामनेर येथील ओम शांती नगर मध्ये गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देविदास देवढे, पो. का. सचिन प्रकाश महाजन ,,किशोर ममराज राठोड ,भगवान तुकाराम पाटील ,नंदलाला दशरथ पाटील ,रूपाली यशवंत खरे, भारत शांताराम पाटील अशा पोलीस पथकाची नियुक्ती करून आज या पोलीस पथकाने मोठ्या सिताफिने ओम शांतीनगर मध्ये जाऊन आरोपी नितीन सुराणा याचे घरी दुपारी धाड टाकली.
नितीन सुराणा हा घरीच असल्याने त्याचे घराची झाडा- झडती घेता त्याचे घरातून विमल गुटख्याची सात पोती पोलिसांनी जप्त केली असून आरोपी नितीन सुराणा यास ताब्यात घेतले आहे .याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश महाजन यांनी आरोपी विरुद्ध फिर्याद दिली असून भादवी कलम 272, 273 ,328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गुटखा बंदी असताना जामनेर शहरात मात्र गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून लाखो रुपयाचा गुटखा दररोज विक्री करणारे सात- आठ होलसेल व्यापारी जामनेर शहरात असून हे व्यापारी दिवसाढवळ्या गुटका विक्री करीत असून शहरातील प्रत्येक पान टपरी ,किराणा दुकान ,तसेच छोट्या मोठ्या व्यवसाय करणारे लोटगाडी वर हा गुटखा मोठ्या प्रमाणावर विकला जातो .अन्न प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव ,तसेच जामनेर पोलीस प्रशासन या गुटखा विक्री करणाऱ्यां होलसेल व्यापाऱ्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असून त्यांच्या छुप्या आशीर्वादाने गुटखा माफिया संपूर्ण जामनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरामध्ये लाखो रुपयाचा माल पुरवित असून जामनेर शहर हे गुटखा माफियांसाठी अतिशय सुरक्षित शहर मानले जाते .
या गुटखा माफीयांना बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला असून एका विशिष्ट पक्षाच्या झेंड्याखाली चमचेगिरी करून मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असे भासवून हे गुटखा माफिया स्वतःची तुमडी भरत आहे.
हे गुटखा माफीया शहरातील प्रमुख मार्केटमध्ये किराणा दुकान, गोळ्या बिस्किटाचे दुकान असे व्यवसाय दाखवून या व्यवसायाच्याआड हे काळा धंदा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्व विभागाच्या पोलीस प्रशासनाला हे अवगत असले तरी राजकीय वरद हस्त असल्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही या अविर्भावात हे गुटका माफिया वावरत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या सर्व गुटखा माफीयावर कार्यवाही करावी अशी मागणी आता जामनेर तालुक्यातून होत आहे.