Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआमदारांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार

आमदारांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधिमंडळाच्या सभागृहात तसेच सभागृहाबाहेर आमदारांची वर्तवणूक कशी असावी, यासंदर्भात येत्या १५ दिवसांत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी विधानसभेत केली. या मार्गदर्शक तत्वांचे उल्लघंन झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, २३ मार्च रोजी विधानसभेच्या आवारात जी आक्षेपार्ह घटना घडली, यासंदर्भात जबाबदार सदस्यांना लेखी ताकीद देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला केलेले जोडो मारे आंदोलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सभागृहात झालेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल जबाबदार आमदारांवर कारवाई करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर सदस्यांनी केली होती. या कारवाईसाठी आज सकाळी विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करीत दिवसभर सभात्याग केला. अखेर आज अधिवेशन संपण्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी आमदारांसाठी मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची घोषणा केली.

दोन्ही प्रकरणातील जबाबदार कारवाई करण्यासंदर्भात आज गटनेते, प्रतोद, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. विधानसभेच्या पायऱ्यांवर, सभागृहाबाहेर अनेक सदस्य आंदोलन करतात, आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि वर्तणुक करतात. त्यामुळे काही अप्रिय घटना घडतात. त्याचे पडसाद सभागृहात उमटतात. अशा घटनांची दखल माध्यमांमध्येही घेतली जाते.

त्यामुळे सदस्यांच्या वर्तनाबद्दल जनमानसात चुकीचा संदेश जातो तसेच सभागृहाची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे यासंदर्भात विचार करण्याची गरज असून त्याअनुषंगाने सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे वर्तन करावे, यासाठी चिंतन करण्याची गरज असल्याचे मत नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तर सदस्यांनी आपले वर्तन विधानसभेचे सदस्य म्हणून साजेसे असे ठेवावे आणि विधिमंडळाची प्रतिमा उंचावावी, असे आवाहनही राहुल नार्वेकर यांनी आमदाराना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या