Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागोवर्‍या विक्रीतून आदिवासी महिलांना उत्पन्नाची हमी

गोवर्‍या विक्रीतून आदिवासी महिलांना उत्पन्नाची हमी

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसूल भागातील अनेक आदिवासी बांधव आणि शेतमजूर येथील गोदाघाट परिसरात कडाक्याच्या थंडीत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आले आहेत. त्यातील काही कुटुंब मोलमजुरी तर काही गावाकडून आणलेल्या गोवर्‍या विकून उदरनिर्वाह करत आहेत. यामध्ये रानशिन्या आणि शेणापासून घरगुती वापरासाठी तयार केलेल्या गोवर्‍यांचा समावेश आहे. यात काही ग्राहक हे गोवर्‍या शेकोटीसाठी तर काही घरगुती पूजाविधी, होमहवन यासह विविध पूजांसाठी नेत आहेत. त्यामुळे गोवर्‍यांना प्रचंड मागणी असून दिवसाला या गोवर्‍यांपासून पाचशे ते एक हजार रुपये मिळत आहेत.

- Advertisement -

ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतीची कामे असतात. यानंतर दिवाळीत भात कापणी आणि झोडणी अशी कामे केली जातात. परंतु दिवाळी झाल्यावर येथील आदिवासी बांधव आणि शेतमजूर हाताला काही काम मिळत नसल्याने आपल्या कुटुंबासह शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर करतो. परंतु अशातच आता हे आदिवासी बांधव आणि शेतमजूर आपल्याला अजून पैसे मिळावे यासाठी गावाकडून कधी धान्य तर कधी गोवर्‍या शहरात विक्रीसाठी आणतात.

यात पुरुषांच्या बरोबरीने महिलादेखील तितक्याच जोमाने उन्हातान्हात काम करताना दिसत आहेत. याबाबत गोवर्‍या विकणार्‍या महिला म्हणाल्या की, दिवाळीनंतर भाताची कापणी केली जाते. मात्र त्यानंतर चार महिने घरी काहीच कामे नसल्याने शहराकडे यावे लागते. या ठिकाणी आल्यानंतर हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहोत. त्यासोबतच गावाकडून रानशिन्या आणि घरगुती वापरासाठी तयार केलेल्या गोवर्‍या विक्रीसाठी आणल्या असून यात रानशिन्या गोवर्‍यांचा एक वाटा 30 रुपये तर घरगुती एक गोवरी 10 रुपयाला विकतो. याबरोबरच गोवर्‍यांची एक गोण 350 रुपयाला विकली जाते.

तसेच सध्या थंडीचा महिना असल्याने काही ग्राहक हे गोवर्‍या शेकोटीसाठी तर काही घरगुती पूजाविधी, होमहवन यासह विविध पूजांसाठी नेत आहेत. त्यामुळे गोवर्‍यांना प्रचंड मागणी असून दिवसाला या गोवर्‍यांपासून पाचशे ते हजार रुपये मिळतात. त्यानंतर या गोवर्‍या संपल्यावर पुन्हा घरी जाऊन नवीन गोवर्‍या आणतो, असे त्यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणाची हेळसांड

एकीकडे रोजगारासाठी आदिवासी बांधव आणि शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते. यामधील काही कुटुंबांची मुले ही इतर ठिकाणी काम करतात. त्यातच शहरात आल्यानंतर या मुलांना नेमके शाळेत कुठे टाकायचे व त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आदिवासी बांधव आणि शेतमजुरांना भेडसावत असतो. त्यामुळे त्यांच्या मुलांची शिक्षणाची गैरसोय होत असते.

आरोग्यावर परिणाम

पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे स्थलांतरीत झालेल्या आदिवासी बांधव व शेतमजुरांना कामाच्या ठिकाणी अवतीभोवती असलेल्या दुर्गंधीमुळे विविध आजार उद्भवतात. त्यांच्यासोबत असणार्‍या लहान मुलांवरही या आजाराचा परिणाम होत असतो. त्यामुळे एखादा व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या