
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मलनिस्सारण योजनेच्या 325 कोटींच्या प्रस्तावासह कोट्यवधीच्या विविध 26 प्रस्तावांना महासभेत मंजुरी देण्यात आली. यासोबतच प्रशासकीय सेवा, वैद्यकीय-आरोग्यसह 11 विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींना मंजुरी देत महासभेने महापालिकेतील प्रस्तावित जम्बो नोकरभरतीला हिरवा कंदिल दाखवला. सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव आता राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून त्यानंतर नोकरभरतीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. या महासभेत मलनिस्सारण योजनेचा 325 कोटींचा प्रस्ताव, गंगापूर धरण थेट जलवाहिनीसाठी ‘मजिप्रा’कडून तांत्रिक तपासणी करणे, मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 10 कोटींचा ठेका देणे, मनपा रुग्णालयांमध्ये स्वयंचलित आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे, पंचवटीतील जलतरण तलाव दोन वर्षे देखभालीसाठी खासगी ठेकेदाराकडे देणे, अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बानायत यांना रुजू करण्यास मंजुरी देणे, कानेटकर जयंतीनिमित्त मनपा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे ‘रंगमहोत्सव’ आयोजित करणे, टाकळी, कपिला संगम सिवेज पंपिंग स्टेशन तीन वर्षांकरता खासगी ठेकेदाराकड देणे आदींसह कोट्यवधी रुपये खर्चाच्या 26 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भरतीच्या घोषणेनंतर 2800 रिक्त पदांमुळे अडचणीत आलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे. अग्निशमन विभागाच्या 348 व आरोग्य विभागातील 358 अशा एकूण 704 पदांच्या भरतीची गेल्या काही दिवसांपासून तयारी केली जात होती. मात्र आता महापालिकेला सर्वच अडीच हजार पदांच्या भरतीची घाई झालेली आहे. या भरतीपूर्वी महापालिकेतील विविध विभागांच्या संवर्गनिहाय सेवा प्रवेश नियमावलींना शासनाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
शासनाकडे सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव पाठवण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाद्वारे प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान अशा मनपाच्या विविध 11 विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीचे प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले होते. या प्रस्तावांना महासभेने हिरवा कंदिल दाखवत नोकरभरतीचा मार्ग मोकळा केला आहे.