Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा नोकरभरतीला हिरवा कंदिल; राज्य शासनाकडून मंजुरी

मनपा नोकरभरतीला हिरवा कंदिल; राज्य शासनाकडून मंजुरी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महापालिकेत मागील सुमारे 24 वर्षांपासून नोकरभरतीची प्रक्रिया (Recruitment process) झालेली नाही. वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठवून देखील आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे त्याचा विचार झालेला नाही.

- Advertisement -

मात्र नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) मागील चार महिन्यापासून प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे आस्थापना खर्च कमी झाल्यानेे नाशिक महापालिकेतील नोकरभरतीच्या सेवा शर्तीला (Terms of service of recruitment) आज नगरविकास मंत्रालयाने (Ministry of Urban Development) मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच नाशिक महापालिकेत नोकर भरती (Recruitment) होणार आहे. नाशिक महापालिकेत नोकर भरती व्हावी यासाठी विशेष महासभा घेऊन तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे रवाना केला होता.

तरीही नोकरभरती झालेली नव्हती. आता अनेक अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेल्या या फाईलवर नगर विकास मंत्रालयाने (Ministry of Urban Development) सेवा शर्तीच्या अटी अंतिम केल्या. प्रशासकीय राजवट आल्यानंतर महापालिकेच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्च 35 टक्कयावरून 33.2 टक्के इतका झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर यांच्या पुढाकारानंतर फाईलचा प्रवास गतीमान झाला.

14 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. यामुळे पदाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधा कमी करण्यात आल्या आहेत. कार्यालयातील विद्युत बिल त्याचप्रमाणे गाड्यांचा इंधन खर्चात बचत झाली आहे. नवीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे.

तसेच वसुलीकडे विशेष लक्ष दिल्याने पाणीपट्टी (water tax), घरपट्टी (house tax) वसुली वाढीचे प्रयत्न चालविले आहेत. महापालिकेत 7717 पदे मंजूर असून त्यातील प्रत्यक्षात मात्र 4679 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 3038 पद मात्र रिक्त आहेत. अ 159, ब 49, क 1472 तर ड वर्गवारीत 1205 इतकी पदे रिक्त आहेत. त्यात डॉक्टर, इंजिनियर, लिपीक अशा अनेक महत्वाच्या पदावर कामांसाठी लोक नाहीत.

नाशिक महापालिकेत गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये प्राधान्यक्रमाने डॉक्टर्स, इंजिनियर तसेच फायरमन यांची भरती होणार आहे. मात्र ही भरती प्रक्रिया महापालिका प्रशासन करणार नसून देशातील नामांकित अशा कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाईल. त्यांची परीक्षा,मुलाखती खाजगी कंपनीद्वारे होऊन आपल्या मागणीप्रमाणे मनुष्यबळ आपल्याला मिळणार आहे.

– रमेश पवार, आयुक्त तथा प्रशासक मनपा नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या