देखभालीअभावीे ग्रीन जिम अत्यवस्थ

जबाबदारी कुणाची? प्रशासन, नागरिक बेफिकीर
देखभालीअभावीे ग्रीन जिम अत्यवस्थ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे तसेच ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्या मान्यतेनुसार महापालिका ( NMC) तसेच विविध लोकप्रतिनिधींच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये ग्रीन जिम (Green Gym)उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांची नियमित देखभाल होत नसल्यामुळे अनेक ग्रीन जिमची दुरवस्था झाली आहे.यामुळे त्याचा उपयोग तर नाहीच मात्र दुसरीकडे त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन सर्व ग्रीन जिम दुरुस्त करून लोकांसाठी उपयोग व्हावा, अशा सुस्थितीत करावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील मध्य नाशिक मध्ये खासदार हेमंत गोडसे तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रीन जिम लावण्यात आले आहेत. मात्र त्यांची व्यवस्थित निगा राखण्यात आली नसल्यामुळे यातील बरेचसे ग्रीन जिमचे साहित्य तुटून पडले आहे. पखाल रोड परिसरात असलेल्या एका ग्रीन जिममध्ये सध्या एकही वस्तू कामाची नसल्याचे दिसून आले आहे.

फैजाने औलीया नगर परिसरात ग्रीन जिम लावण्यात आले होते. त्यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला. मात्र हळूहळू त्याची दुरवस्था होऊन त्यातील बर्‍याचशा वस्तू तुटल्याने त्याची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. सध्या ही ग्रीन जिम बंद अवस्थेत पडली आहे. त्याचप्रमाणे सारडा सर्कल, मदिना चौक, मुंबई नाका परिसरातील ग्रीन जिमची देखील हीच अवस्था आहे. अनेक ग्रीन जिमला जाण्यासाठी मार्ग नाही तर ज्या ठिकाणी मार्ग आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गवत आले आहे.

यामुळे तिकडे किड तसेच चिखलची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा ग्रिन जिमचे उपयोग होताना दिसत नाही. जुन्या नाशिक परिसरातील चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, नानावली, अमरधाम रोड आदी भागात काही प्रमाणात ग्रीन जीम लावण्याचा प्रयोग झाला, मात्र तो देखील यशस्वी झाला नाही. यामुळे शासनाच्या लाखो रुपये पाण्यात गेले.

पश्चिम विभाग

नाशिक शहरात महापालिकेची 481 उद्याने, त्यात 250 हून अधिक उद्यानांमध्ये ग्रीन जीमचे साहित्य बसविण्यात आले.त्यात नाशिक पश्चिम या उच्चभ्रु विभागातील उद्यानातही ते उभे केले खरे मात्र त्यांच्या सुटे भाग चोरीवर कोणाचे नियंंत्रण नाही. काही ठिकाणी गंज चढला.गवत वाढले.अशी स्थिती आहे. उद्यानातील खुल्या मैदानावर व्यायामाचे साहित्य बसविण्यात आल्याने त्याचा परिसरातील नागरिकांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. पुर्वी खासदार, आमदार निधीतून बसवलेले ग्रीन जीम नंतर नगरसेवकांंच्या निधीतून उभे राहू लागले.

नगरसेवकांंकडून आपल्या प्रभागांमध्ये ग्रीन जीम बसविण्याला प्राधान्य दिलेे. एका ग्रीन जीमवर 5 ते 8 लाख रुपये खर्च केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसाधन गृहा शेजारीच जीम उभारली. मात्र तिचा लाभ घेतांना कोणीही दिसत नाही. प्रसाधनगृह बांधून बंदीस्त ठेवल्याने ग्रीम जीमचीच जागाच प्रसाधनासाठी वापरली जाते, अशी स्थिती आहे. प्रमोद महाजन उद्यान, शरणपूर येथील जॉगींग ट्रॅकवर,ऋषी नगर येथे जीम आहे.

त्याचे पार्ट खिळखिळे होऊ लागले आहे. दोन वर्ष करोनामुळे नंतर पावसामुळे वापर न झाल्याने गंज चढला आहे. आजुबाजुला गवत वाढल्याने विंचु काट्याच्या भितीने इच्छा असुनही ग्रीन जीमची पायरी चढतांना नागरिक घाबरत आहे. तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नाही. अशा नागरिकांची तक्रार आहे. ग्रीन जीम व्यवस्था चागली. मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही तेवढेच लक्ष दिले तर खर्च वाया जाणार नाही.

नवीन नाशिक

कामगार वसाहत म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिक परिसरात कामगार वर्गाची प्रकृती व्यवस्थित रहावी तसेच या मेहनती वर्गाला व्यायामाद्वारे शरीरयष्टी चांगली मिळावी याकरिता आमदार, खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून विविध ठिकाणी सुमारे 120 ग्रीन जिम बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी सुमारे 20 ते25 ग्रीन जिम ह्या आमदार सिमा हिरे यांच्या निधीतून बसविण्यात आल्या आहेत.

जसाजसा या ग्रीन जिमचा वापर वाढू लागला तसा तसा त्याच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच काही नागरिकांच्या चुकीच्या वापरामुळे ग्रीन जिमची दुरवस्था झाली आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील सहाही विभागामध्ये या ग्रीन जिमच्या दुरुस्तीकरिता ठेकेदाराची निवड करण्यात येणार होती. मात्र ग्रीन जिमची दुरवस्था बघता अद्यापही ही निवड झाली नसल्याचे समजते. यामुळे व्यायाम प्रेमींमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते.

पंचवटी

पंचवटीतील ग्रीन जीनमध्ये गवत वाढल्यामुळे गोमाता सध्या जिम करत आहेत. कुणाचे हँडल तर कुणाचे प्यांंडल गायब झाल्याचे चित्र आहे. तीन माजी महापौर, तीन स्थायी समिती सभापती होऊन गेलेल्या पंंचवटी विभागात बर्‍याच ठिकाणी ग्रीन जीम उभारली आहे.एकेकाळी शहरात सर्वांत चांगले उद्यान असलेल्या पंचवटीतील उद्यानात ग्रीन जीमकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भाऊसाहेब हिरे नगर, हिरावाडी पंचवटी येथील ग्रीन जीममध्ये गवत वाढल्यामुळे गोमाता सध्या जिम वर उभ्या पाहुन नागरिकही अचंबीत होत आहेत. ग्रीन जिमचे बरेच साहित्य गायब झाल्यामुळे अर्धवट जिम गवतात उभी आहे. हिरावाडीतील एस एफ सी ग्राउंडवर असणारे ग्रीन जिम सध्या पावसामुळे गंज चढल्यामुळे बंद असते. विधाते नगर, हिरावाडी रोड येथाल जीमचे हँडल, प्यांंडल सातत्याने गायब होत आहे.

सातपूर

ग्रीन जिम म्हटले नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी एक व्यायाम शाळा होय. हे साहित्य जमिनीमध्ये फिट असल्याने केव्हाही या ठिकाणी जाऊन व्यायाम करता येतो.मात्र शासनाच्या चांगल्या धोरणाचा काही समाजकंटकांनी कसा बट्ट्याबोळ केला याचे हे चित्र सातपूर परिसरातून दिसून येत आहे.

सातपूर परिसरात सुमारे 25 ते 30 ठिकाणी माजी खासदार समीर भुजबळ व आ.सीमा हिरे यांच्या निधीतून ठिकठिकाणी ग्रीनजीम उभारण्यात आल्या आहेत.त्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या स्वास्थ रक्षणात कंबर,पाय, हातांना व्यायाम देण्याचे सहज सोपे प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही ग्रिनजीम परिसरातील नागरिकांच्या जागरुकतेमुळे अतिशय सुस्थितीत आहेत.मात्र यांची देखभाल दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासोबतच नागरिकांची या वस्तूंच्या वापराबद्दलची प्रवृत्ती अतिशय खराब असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे.

अनेक ठिकाणी पायांच्या व्यायामासाठी असलेले वॉकरयंत्र खराब झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी त्याच्या दोन पायांपैकी एक पाय गायब झाला आहे तर काही ठिकाणी दोन्ही पाय गायब आहेत. सातपूर कॉलनीलगत असलेल्या खोडेपार्क परिसरात आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून उभारलेले ग्रीन जिम अतिशय सुरळितपणे चालत होते.नागरिकही त्याठिकाणी व्यायामाला येत होते. मात्र अचानकपणे ते संपूर्ण ग्रीन जिमच उखडून बाहेर टाकल्याचे दिसून येत आहे. हे ग्रीन जिम कोणी तोडले व त्यामागे त्यांचा काय उद्देश्य आहे.ते पुन्हा उभारले जाणार आहेत की नाही.

याबाबत परिसरातील नागरिकांना देखील काहीच माहिती नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. सातपूर कॉलनी,शिवाजीनगर,श्रमिक नगर, अशोक नगर यातील बहुतांश उद्यानात लावण्यात आलेल्या ग्रीन जिमची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. दिवसा याठिकाणी टवाळखोरांचा अड्डा असल्याने इथले लोखंडी साहित्य तोडून विकण्याचा प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या टवाळखोरांना कोणी अटकाव करावा हा एक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहत आहे. प्रशासनाने तातडीने शासनाच्या निधीतून उभारलेल्या या ग्रीन जिमबाबत विशेष काळजी घेऊन पुन्हा त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com