वीजसंकटात मोठा दिलासा

भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी
वीजसंकटात मोठा दिलासा

मुंबई/नाशिकरोड । प्रतिनिधी Mumbai/ Nashikroad

उन्हाच्या ( Summer Season )प्रकोपात कोळसा टंचाई ( Coal Shortages ) व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन संपुष्टात आणण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.एनटीपीसीच्या सोलापूर (Solapur NTPC )औष्णिक प्रकल्पातून 525 मेगावॅट वीज मिळवण्यात महावितरणला ( Mahavitaran ) यश मिळाले आहे.

दरम्यान, पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत असल्याने मागणी आणि पुरवठा यातील तूट कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. उन्हाच्या तडाख्यातील वीजसंकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील 2 कोटी 80 लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढत्या उष्म्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेला 24,500 ते 25,000 मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई व इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे 2,300 ते 2,500 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी नाईलाजास्तव राज्यात भारनियमन करावे लागले. त्यातही देशात कोळसा व वीजटंचाईचे स्वरुप तीव्र असल्याने वीज उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut )यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत राज्यात भारनियमन होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वीजतुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालीन नियोजन केले. भारनियमन टाळण्यासाठी व विजेची तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले. त्यामुळे आता पुरेशी वीज उपलब्ध झाली असून दोन दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. राज्यातील भारनियमनदेखील टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले आहे.

दुरुस्तीनंतर संकट सुसह्य

एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक प्रकल्पातील विजेचे संच 6 एप्रिलपासून तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने 525 मेगावॅट वीजपुरवठा बंद झाला होता. महावितरणकडून एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून वीजसंचाची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. परिणामी वीजसंचाची दुरुस्ती करण्यात आली. शनिवारी (दि. 16) दुपारपासून सोलापूर औष्णिक प्रकल्पातून 525 मेगावॅट वीज महावितरणसाठी उपलब्ध झाला आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात कोळसाटंचाईमुळे वीजसंकट ओढवले असताना महावितरणच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यामुळे राज्यातील नागरिकांना भारनियमनातून मोठा दिलासा मिळाला आहे.

सौरपंप बसवून घ्या : तनपुरे

अहमदनगर । वीजनिर्मितीसाठी प्रचलित पद्धतीने कोळशाचा वापर सर्वाधिक होतो. येत्या 15-20 वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणार आहे. त्यानंतर सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. शेतकर्‍यांना सध्या सौरपंपासाठी अनुदान मिळत आहे. शेतकर्‍यांनी सौरपंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकर्‍यांना आज दिला. राज्यातील सध्याच्या भारनियमनाला केंद्र सरकार जबाबदार आहे. हे संकट कोसळण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com