बाप्पांच्या निरोपासाठी शहरात जय्यत तयारी

मिरवणूक मार्गावर पोलिसांंचे संचलन; मनपाही सज्ज : मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
बाप्पांच्या निरोपासाठी शहरात जय्यत तयारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या ( Anant Chaturdashi )निमित्ताने गणपती विसर्जन (Ganesha Immersion)मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. बैठकीत मिरवणूक सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

त्यानंतर मिरवणूक मार्गावर भद्रकाली पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलिस ठाणे आणि पंचवटी पोलीस ठाणे यांचे संचलन पार पडले. नाशिकरोड पोलीस ठाण्याचा हद्दीत देखील आज पोलिसांचे संचलन पार पडले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, निलेश माईनकर उपस्थित होते.

शहरातील पोलीस संचलनावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साजन सोनवणे आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे तसेच फौजफाटा उपस्थित होता. शीघ्र कृती दल, होमगार्ड यांनी देखील सहभाग नोंदवला.

मिरवणूकीत सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये कुठल्याही कारणावरून शाब्दिक वाद होऊ नये, मिरवणूक शांततेत उत्साहात पार पडावी, कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अमोल तांबे, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांनी प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक बोलविली होती.

मनपाही सज्ज : धोकादायक झाडांच्या फांद्यांंची छाटणी

सध्या नाशिक शहर परिसरात अचानक वादळी वार्‍यासह कधीही पाऊस पडत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारे दुर्घटना होऊ नये, याची खबरदारी घेत नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीची मोहीम हाती घेतली आहे.आधुनिक पद्धतीने वाहनाचा वापर करून महापालिकेचे सेवक झाडाच्या टोकापर्यंत जाऊन फांद्या छाटणी करीत आहे. शहरातील शालीमार, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, तसेच सातपूर, पंचवटी, नाशिक रोड, नवीन नाशिक आदी भागात देखील या प्रकारे मोहीम घेण्यात आली आहे.

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

महानगरपालिकेतर्फे शहरातील विसर्जन स्थळे आणि मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आणि पूर्व, पश्चिम पश्चिम विभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

सारडा सर्कल येथील वाकडी बारव ते गौरी पटांगण दरम्यान चार किलोमीटर मार्गाची पाहणी करण्यात आली. पंचवटी भागातील मालेगाव स्टॅण्ड सिग्नल, इंद्रकुंड, होळकर ब्रिज, गौरी पटांगण, नांदूर घाट येथे सुरु असलेल्या कामांची समक्ष पाहणी करुन सुचना करण्यात आल्या. या ठिकाणी स्मार्ट सिटीकडून होणा-या कामांबाबत सीईओ सुमंत मोरे यांच्याशी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी चर्चा केली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दुसरीकडे पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, मुख्य लेखापरीक्षक बोधीकरण सोनकांबळे यांनी लक्ष्मीनारायण घाट आणि कृत्रिम तलावांची पाहणी केली.

पंचवटी भागात शिंदे नगर ते ड्रीम कॅसल चौक या मार्गावरील खड्डे बीबीएम मटेरीअलने बुजवण्यात आले आहेत. पश्चिम विभागात रविवार कारंजा परिसर , शालिमार परिसर येथे खड्डे भरुन पॅच वर्क करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील संगम घाटकडे जाणारा रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.

सातपूर-अंबड लिंक रोड येथील गणेश विसर्जन स्थळ ठिकाणी मंडप टाकणे, पाण्याचे कुंड ठेवणे ही कामे करुन परिसराची साफ सफाई करण्यात आली आहे. सातपूरमधीलच प्रभाग क्रमांक १० येथील त्रंबक रोड, प्रभाग क्रमांक 8 येथील विश्वास बँक, प्रभाग क्रमांक २६ मधील आयटीआय पुल खुटवड नगर रस्ता येथील रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.

विसर्जनस्थळी जीवनरक्षकांची फौज

येत्या शुक्रवारी गणेश विसर्जन होणार आहे. या निमित्ताने महापालिका प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी तब्बल दीडशे रक्षकांची फौज तैनात करण्यात येणार आहे. त्यांना लाईफ जॅकेट व इतर आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली जाणार आहे.पोलिसांच्या माध्यमातून जीवनरक्षकाची माहिती तपासून त्यांची नियुक्ती केली जाईल. महापालिकेने 71 ठिकाण निश्चित केले असून इतरही नियोजन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com