
नागपूर | Nagpur
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाचा आक्षेप नसून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये, अशी ओबीसी समाजाची भावना आहे. पण सरकार जर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार असेल तर, ओबीसी समाज शांत राहणार नाही. सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला.
ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनांची बैठक नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. ही बैठक कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हती. ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी भूमिका जाहीर केली.
नोव्हेंबर महिन्यात संविधान दिनी ओबीसी समाज भव्य सभा घेणार असून समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव या सभेतून करून दिली जाणार आहे. कोणी जर ओबीसी समाजाला गृहीत धरत असेल तर त्यांचे मनसुभे या सभेत उधळून लावले जातील, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाने जातीनिहाय जनगणनेची भूमीका घेतली आहे. इतर पक्षांनीही ही भूमीका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी ते म्हणाले की, ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी लवकर कृती समिती गठीत करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत समाजाचे नुकसान होऊ नये, अशी ओबीसी समाजाची भावना आहे. ओबीसी समाजामध्ये अनेक घटक आहे. आम्ही जातीसाठी लढत नाही, समूहासाठी लढतो आहे. ओबीसी समाजाला आवश्यक सोई, सुविधा, सवलती मिळत नाहीत. सरकार ओबीसींच्या प्रश्नांसदर्भात गंभीर नाही. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकारने विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे.