अशुध्द पाणीपुरवठा झाल्यास ग्रामसेवक, सरपंच जबाबदार

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांचा इशारा
अशुध्द पाणीपुरवठा झाल्यास ग्रामसेवक, सरपंच जबाबदार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गावातील पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण (Purification of drinking water) करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची ( Grampanchayat )असून पिण्याच्या पाण्याचे दररोज शुध्दीकरण करणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रणाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( ZP CEO Leena Bansod ) यांनी दिले.

दरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यालयात घेतलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव व चांदवड तालुक्यात सरपंच व ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील एकाही गावात अशुध्द पाण्यामुळे कुणालाही त्रास झाल्यास याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीची बैठक बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात आली.या बैठकीत पाणी शुध्दीकरणाबाबत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असून ग्रामपंचायत हद्दीत असणारे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत परिसर यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने पाणी दुषित होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात उच्चतम दर्जाचे टी.सी.एल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

त्याचप्रमाणे गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची (स्त्रोत ते शेवटच्या नळ जोडणी पर्यंत) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे तसेच पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करणेकामी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले.

गटविकास अधिकार्‍यांनी तालुकास्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन त्यामध्ये गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुध्दीकरण करणे, गावातील सर्व कचर्‍याचे व्यवस्थापन करणे, गावातील सर्व परिसराची स्वच्छता करणे आदी कामे करण्यबाबत माहिती देण्याच्या सुचना देण्यात आल्या.

आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वचछता) डॉ. वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) श्री. पुरुषोत्तम भांडेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नाशिक, जीवन बेडवाल यांच्यासह गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी )आरोग्य/ ग्रामपंचायत)आदी उपस्थित होते.

नांदगाव व चांदवड येथे आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज नांदगाव व चांदवड तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक कामाचा सविस्तर आढावा घेतला. पाणी शुध्दीकरणासाठी टी.सी.एल. खरेदी कोठून केली जाते, पुरवठाधारकाचे परवाने वैध आहेत काय? खरेदी केलेल्या टी.सी.एल.ची तपासणी करण्यात येते का?, टी.सी.एल.चा साठा कसा ठेवण्यात येतो याबाबत ग्रामसेवकांकडून आढावा घेण्यात आला.

एकाही ग्रामपंचायतीमध्ये मुदत संपलेली किंवा कमी क्लोरीन असलेली टी.सी.एल. आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. गावात ज्या-ज्या ठिकाणाहून पिण्याचे पाणी घेतले जाते तेथे पाणी शुध्दीकरण करणे आवश्यक असून पावसाळयाच्या दिवसात याबाबत विशेष दक्षता घेण्याचे सांगितले. बैठकीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी चांदवड चे गट विकास अधिकारी महेश पाटील, नांदगाव येथे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com