नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारी (दि.३) नाशिक जिल्हा दौऱ्यावर अाहेत. त्यांच्या उपस्थितीत सटाणा, सुरगाणा व नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या या दौऱ्याचत राजशिष्टाराचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपरिषद व देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्ट, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमास सकाळी ११ वाजता हजेरी लावतील.

या कार्यक्रमानंतर दुपारी अडीच वाजता सुरगाणा तालुक्यातील भिंतघर (गुलाबगाव) येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करतील व तेथील गोशाळेस भेट देणार असून त्यानंतर नाशिककडे प्रयाण करतील. नाशिक शहरातील सातपूर येथील नॅशनल ब्लाइंड असोसिएशनच्या संशोधन व प्रशिक्षण निवास केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास सायंकाळी उपस्थित राहून राज्यपाल शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी पूर्वतयारीची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.