ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा; बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा; बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० हुन अधिक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi government) अडचणीत आले आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काल रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यांनतर आता राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे...

याबाबत राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे की, राजभवनला २८ जून रोजी सात अपक्ष आमदारांनी पाठवलेला ई-मेल आणि विरोधी पक्षाकडूनही सरकारने बहुमत गमावला असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे राज्य सरकारने आपले बहुमत सिद्ध करावे अशा सूचना करण्यात येत असल्याचे राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच गुरुवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात यावी असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीच्या वेळी काही अटी देखील घातल्या आहेत.

राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी घातलेल्या अटी खालीलप्रमाणे

१) राज्याच्या विधान भवनाचे विशेष अधिवेशन उद्या गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले जावे. यात फक्त सरकारच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया घेतली जावी. इतर कोणताही अजेंडा असू नये. तसेच बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करावी.

२) राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच संपूर्ण प्रक्रियेवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची संपूर्ण काळजी घेतली जावी.

३) बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचे लाइव्ह टेलिकास्ट केल जावे आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था उपलब्ध केली जावी.

४) मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मतमोजणी शिरगणती पद्धतीने घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभे राहून त्याची गणती केली जावी आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.

५) विशेष अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया आणि बहुमत चाचणी उद्याच पूर्ण केली जावी. अधिवेशन कोणत्याही पद्धतीने स्थगित करता येणार नाही.

६) उद्याच्या संपूर्ण अधिवेशनाचे स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे याची जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची राहील. याचे संपूर्ण फुटेज माझ्याकडे सुपूर्द करावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com