
मुंबई | Mumbai
खाद्यान्न पदार्थांमध्ये (Foodstuffs) भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीप परिणाम होतो. सणासुदीच्या काळात तर, मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थ (Dairy products) यांच्यात भेसळीचे प्रमाण प्रकर्षाने समोर येते.
या फसवेगीरीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Food and Drug Administration Minister Sanjay Rathod) यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात दुधात होणारी भेसळ (adulterated) रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत (Assembly) दिली.
विधानसभा सदस्य अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी कांदिवली येथून भेसळयुक्त दूध साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री राठोड म्हणाले की, मुंबई शहरामध्ये येणारे दूध मानकाप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी नाका मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत दुधाची चाचणी त्याच ठिकाणी करून दूध कमी दर्जाचे आढळल्यास त्याची कायदेशीररित्या विल्हेवाट केली जाते.
त्याबरोबरच, या विभागातील रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच दुधातील भेसळ तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करण्यात येणार आहे. याबाबतची लवकरच एसओपी तयार करण्यात येईल. दुग्धविकास मंत्री यांच्या समवेत लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असेही मंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.