
नाशिक | Nashik
स्वस्त धान्य (grain) दुकानांमधून आनंदाचा शिधा देण्याची राज्य शासनाने घोषणा केली खरी. मात्र, गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीचा मुहूर्त किमान हुकू नये, याची दखल शासनाने घेतली आहे. शहर व जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात झाली असून डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी हा शिधा सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.
गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळालाच नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. मात्र डॉ. आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधत शासनाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील तालुका, गाव पातळीवरील रास्त भाव दुकानांमध्ये आनंदाचा शिधा संच पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याचे वाटपही लाभार्थ्यांना सुरू झाले आहे. नाशिक तालुक्यात काही ठिकाणी अद्याप हे संच पोहोचलेले नाही ते एक-दोन दिवसात पोहोचतील, अशी माहिती रास्त भाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली. जिल्ह्यात आनंदाचा शिधा (aanandacha shidha) मिळणारे लाभार्थी सुमारे सात लाख आहेत. या सर्वांना वाटप केला जाणार आहे.
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळी प्रमाणेच डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे.नाशिक जिल्ह्याकरिता सात लाख 82 हजार 562 जणांना शिधा संच पुरविले गेले आहेत. शासनाच्या (Government) गोदामातून हे संच प्रत्येक रेशन दुकानदारापर्यंत पोहोचले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा मिळाला नव्हता.
यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा (Jayanti) मुहूर्त टळू नये,अशी दखल शासनाने घेत जयंती पूर्वी हे संच पुरविण्यात आले असून त्याचे वाटपही सुरू आहे. शंभर रुपयात चार वस्तूंचा हा संच १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये एका संचात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर पाम तेल असे वितरित केले जात आहेत.