
मुंबई | Mumbai
शेतकरी, कष्टकरी, आदिवासी समाजाच्या मुलभूत मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी येथून माजी आमदार जे.पी. गावित (Former MLA J.P. Gavit) यांच्या नेतृवाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्च काढण्यात आला होता.
या लाँग मार्च (Long March) संदर्भात आज मुंबईत महत्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी शिष्टमंडळाची आज बैठक होऊन त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, माजी आमदार कॉम्रेड जे. पी. गावित, किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते आणि माकपचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड (Dr. D. L Karad) हे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी माध्यमांना दिली आहे. शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत आणि त्यांच्या मागण्यांबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करणार आहेत, असेही सत्तार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याच्या माहितीला आमदार विनोद निकोले यांनीही दुजोरा दिला आहे.
या यशस्वी बैठकीनंतर उद्या शेतकरी 'लाँग मार्च आंदोलन' मागे घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तास चाललेल्या बैठकीनंतर सकारात्मक तोडगा निघाला आहे. तसेच काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार, असे इंद्रजित गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.