
मुंबई | Mumbai
देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, ऑलिम्पिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलाने फडकावणारे मराठमोळे पैलवान खाशाबा जाधव (Khashaba Dadasaheb Jadhav) यांची ९७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त गूगल डूडल (Google Doodle) बनवून त्यांना खास मानवंदना दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं ऑलिंपिंक मेडल मिळवून दिलं. खाशाबांच्या या पराक्रमानं त्यांचं नाव अवघ्या देशाला माहित झालं. पण खाशाबांच्या या विजयामागे त्यांची मेहनत आणि जिद्द होती.
पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्याच्या एका खेडेगावात झाला. खाशाबा हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई. घरची शेती, वडील शेतकरी होते आणि सोबत कुस्तीही खेळायचे. या जाधवांच्या घरात शेतीची कामं झाली की, संध्याकाळी कुस्तीचे डाव खेळले जायचे. (Success story of Khashaba Jadhav)
दादासाहेब जाधवांनी खाशाबाचे कुस्तीतील प्राथमिक शिक्षण आपल्या घरीच पूर्ण केले. पुढे खाशाबांना महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. खाशाबांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही भाग घेतला. त्याचवेळी आपल्या देशाचा तिरंगा ऑलिंमिक स्पर्धेमध्ये फडकवण्याचा निश्चिय केला.
असे म्हटले जाते की, त्यांचा कुशल दृष्टीकोन आणि उत्कृष्ट डावपेच यामुळे ते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणले जाऊ लागले. जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या (जे एक कुस्तीपटू देखील होते) आणि इतर व्यावसायिक कुस्तीपटूंच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
खाशाबा जाधवांनी १९४८ मध्ये लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी खशाबांना अनेकांनी आर्थिक मदत केली होती. पुढे १९५२ मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्री स्टाइल प्रकारात कास्यंपदक जिंकून खाशाबा जाधव तमाम भारतीयांच्या गळ्यातील स्टार झाले.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमधील जबरदस्त कामगिरीनंतर आपली कुस्ती कारकीर्द पुढे सुरू ठेवता आली नाही. नंतर त्यांनी पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केले. १९८४ मध्ये त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार प्रदान केला. २०१० मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी कुस्तीचे ठिकाणही त्यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले होते.
एकीकडे गुगलसारख्या दिग्गज विदेशी कंपनीने खाशाबा जाधव यांचा सन्मान केलेला असताना दुसरीकडे अद्यापही देशातील सरकारने त्यांच्या या कामगिरीची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. देशासाठी कुस्तीत पहिलंवहिलं वैयक्तिक पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांना अद्यापही सरकारने पद्म पुरस्कार दिलेलं नाही.