हा काळ विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासाचा!
मुख्य बातम्या

हा काळ विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासाचा!

प्रयोगशील शिक्षकाने सुचवले विविध उपक्रम

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक। प्रतिनिधी

केंद्र सरकारने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित व्हाव्या, त्यांनी काय शिकावे हे निश्चित केले आहे. सध्याच्या काळात पाठ्यपुस्तकांच्या मदतीने शिक्षक व पालक मुलांच्या विविध क्षमतांचा विकास करायचा प्रयत्न नक्की करू शकतात, असे मत प्रयोगशील शिक्षक व शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.

प्रश्न : ही संकल्पना स्पष्ट कशी कराल?

उत्तर : अवतीभवतीच्या निसर्गातील वृक्षवेली यासंबंधीची माहिती मिळवणे, त्यावर चर्चा करणे, त्यांची फळे, फुले, खोड, मुळे, पाने यांचे आकार, रंग व चव यासारख्या अनेक गोष्टी परिसर शिक्षणात आहेत.

इयत्तांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून विद्यार्थ्यांना परिसरातील विविध व्यावसायिक, कुटुंबातील सदस्य यांच्या मुलाखती घेता येतील. त्याचबरोबर स्वयंपाक घरातील विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ, कडधान्य, तृणधान्य, स्वयंपाकामध्ये विविध प्रकारच्या वापरल्या जाणार्‍या वस्तू, भाज्या तयार करताना केली जाणारी प्रक्रिया, त्यातील घटनाक्रम तो समजून घेणे, सांगणे आणि लिहिणे या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत.

या काळात वर्तमानपत्रात येणार्‍या विविध साप्ताहिक पुरवण्या. त्यात येणारी चित्रे हा देखील विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा भाग आहे. चित्राचे निरीक्षण करणे त्याचे वाचन, वर्णन, चित्र गप्पा यासारख्या सर्वच गोष्टी उपयोगी पडणार्‍या आहेत.

एका चित्रातून हे सर्व टप्पे साध्य करता येतील. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी चित्र वर्णन अधिक करतील तर उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी त्या चित्रात असणारी पात्र एकमेकांशी काय बोलत असतील त्यांचे प्रश्न, संवाद रूपाने लिहू शकतील.

चित्र एक असले तरी आणि सर्व टप्पे सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले तरी विद्यार्थ्यांचा भाषा विकास ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे मुलांच्या निरीक्षणात आणि लेखनात फरक पडेल. वरच्या वर्गातील मुले विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार, काव्यपंक्ती, अभंग यांचा लेखनात वापर करू शकतील. ज्या आधारे मुलांचा भाषा विकास होईल.

प्रश्न : पारंपरिक अभ्यासक्रमाला हे कसे पूरक ठरेल?

उत्तर- अकरावीच्या वर्गात बातमी लेखन, बारावीच्या वर्गात पुस्तक आणि दुसरीच्या पुस्तकात जाहिरात असे घटक समाविष्ट आहेतच. वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या, त्याचे लेखन हा देखील अभ्यासाचा भाग आहे.

वृत्तपत्रातील जाहिराती विविध इयत्तांमध्ये अभ्यासाला आहेत. त्याचबरोबर अवांतर वाचनासाठी, सामान्यज्ञान वाढण्यासाठी वर्तमानपत्रात येणार्‍या कथा, विविध प्रकारची व्यक्ती चित्रे, लेख, कोडे यांचा पुरेसा वापर हाही अभ्यासाचा भाग ठरू शकतो.

प्राथमिक स्तरावर शब्दचक्र, अक्षर डोंगर, विनोद, कविता पाठांतर, आकाशवाणी, दूरदर्शनच्या बातम्या ऐकणे, विविध विषयांवरती लेखन करणे. लेखनाचे विविध प्रकार समजून घेणे. त्यासाठी स्वतःची लेखन शैली विकसित करणे. विविध प्रकारचे वाड्.मय प्रकार वाचणे, पाठ्यक्रमात असलेल्या विविध लेखकांची चरित्र समजून घेणे हा अभ्यासाचा भाग आहेत.

एखादा शब्द, त्यापासून तयार होणारे असंख्य शब्द, त्या शब्दांच्या आधारे तयार होणारी वाक्ये अशी तयारी करून घेतली तर मुलांचा भाषा विकास, निबंध लेखन, शब्दावरून उतारा तयार करणे याची उत्तम तयारी होऊ शकते.

उदाहरणार्थ शेत, खेळ. छोटी मुले परिसरातील अंगणातील बिया, खडे, काड्या मोजणे, एकमेकाला देणे त्यातून गणिती क्रिया समजून घेऊ शकतात. अशी मुलांची अभ्यासपूर्व तयारी झाली तर जेव्हा केव्हा शाळा तेव्हा अभ्यास समजून घेणे सोपे होईल. कदाचित अभ्यास गतीने पूर्ण होईल.

Deshdoot
www.deshdoot.com