खुशखबर : दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतला 'हा' निर्णय

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती
खुशखबर : दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने घेतला 'हा' निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

दिवाळी ( Diwali festival-2022 )आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किेंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने ( MSRTC ) यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १ हजार ४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या गाड्या धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी गुरुवारी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत २९ सप्टेंबर २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद प्रदेशातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे चन्ने यांनी सांगितले.

दरम्यान, एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com