खुशखबर! द्वारका ते दत्तमंदिर चौक उड्डाणपुलाचा भारतमाला प्रकल्पात समावेश

खुशखबर! द्वारका ते दत्तमंदिर चौक उड्डाणपुलाचा भारतमाला प्रकल्पात समावेश

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

द्वारका चौकातील (Dwarka Chowk) वाहतुकीची कोंडी (Traffic jam) कायमस्वरुपी सुटावी, अपघातांना अळा बसावा यासाठी द्वारका ते दत्तमंदिर चौक (Dwarka to Dattamandir Chowk) दरम्यानाच्या सहा किलोमीटर महामार्गावर उड्डाणपुल (Flyover) असणे गरजेचे होते...

त्यासाठी विविध निकष पूर्ण झाल्याने या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या भारतमाला योजनेत (Bharatmala project) समावेश करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रयन्त व पाठपुराव्याला साथ करीत हे काम मंजूर केल्याने नाशिकच्या विकासात हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील द्वारका चौक असून येथे मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरुन नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वात दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे.

परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल या दरम्यानच वाहतुकीची सतत कोंडी होत असते.तसेच द्वारका चौकात होणाऱ्या कोंडीमुळे मुंबई व आग्राकडे जाणारी वाहतुकही सतत विस्कळीत होत असते.

द्वारका चौक ते नाशिकरोड पर्यंत वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत द्वारका चौकातील वाहतुकीचा प्रश्न किती गंभीर आहे, याचे महत्त्व पटवून दिले होते.

यातुनच गडकरी यांनी प्रस्तावित उड्डाण पुलाला तत्वत: मान्यता देवून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हा रस्ता महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता.

दरम्यानच्या काळात द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात आला होता. खा. गोडसे यांनी सदर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तशी शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यास भाग पाडले होते.

आज केंद्रीय मंत्री गडकरी यांनी द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याचे ट्विवट केले. त्यामुळे या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी निधी कोणता विभाग देणार हा विषय निकाली निघाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर शहरात रस्ता, रस्त्याच्या वर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो कार्यरत आहे. याच धर्तीवर द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपूल या रस्त्यादरम्यान उड्डाणपूल आणि मेट्रोची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मेट्रो प्रशासन व नॅशनल हायवे, यांनी एकत्रितपणे नियोजन करावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- खा. हेमंत गोडसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com