गोदावरी विशेष रेल्वे प्रायोगिक तत्वावर

आता 30 जूनपर्यंत वाढविली मुदत
गोदावरी विशेष रेल्वे प्रायोगिक तत्वावर

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मनमाड-मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन ( Manmad- Mumbai Godavari Special Train )प्रायोगिक तत्वावर 35 दिवसांसाठी सुरु झाली. तिची मुदत 15 मेपर्यंत होती. ती आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. दीड महिन्यांच्या वाढीव कालावधीत गोदावरी स्पेशल ट्रेनच्या एकुण 92 फेर्‍या होतील, अशी माहिती भुसावळचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी व्टिटव्दारे नमूद केले आहे.

रेल्वेगाड्यांना जोपर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी लाभत नाही, नफ्यात येत नाहीत, तोपर्यंत त्या बंद ठेवण्याचे नवीन धोरण रेल्वेने स्वीकारल्याने गोदावरी बंद झाली आहे. पॅसेंजर, गोदावरी व अन्य ट्रेन रेल्वेने बंद केल्यामुळे जनक्षोभ वाढला आहे. गोदावरीचा तोटा या तीन महिन्याच्या काळात कमी होऊन गाडी नफ्यात चालली तर ही गाडी पूर्वीप्रमाणे कायमस्वरुपी सोडू. असे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव (Railway Minister Vaishnav)यांनी दिले आहे.

करोना महामारी आणि तोट्याच्या नावाखाली गोदावरी गाडी बंद करण्यात आली आहे. जनमताचा रेटा वाढल्याने केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी रेल्वेमंत्र्याकडे प्रयत्न केले. रेल्वेने गोदावरी ट्रेनला स्पेशल ट्रेन नाव देत ती 11 एप्रिल 15 मे अशी 35 दिवसच चालविण्यास सुरुवात केली. नेहमीची मनमाड-गोदावरी एक्सप्रेस ही मुंबईतील एलटीटी स्थानकापर्यंत धावत होती. आता नवीन गाडी ही मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत धावत आहे. नेहमीची गोदावरी ही पंचवटी आणि मुंबईतील लोकलप्रमाणे इंटरसिटी ट्रेनचा दर्जा असणारी आहे. नवीन गोदावरी ही स्पेशल व सुपरफास्ट ट्रेन आहे. तिचे तिकीटाचे दरही नेहमीपेक्षा जास्त आहेत.

स्पेशल गोदावरी प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभला तरच ती कायमस्वरूपी धावणार आहे. उन्हाळी सुट्यांमुळे सध्या गोदावरीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, मुंबईहून नाशिकला येताना गोदावरीला आसनगाव, खरडीला साईड स्थानकात बाजूला करून लखनौ, नंदीग्राम, दुरांतो एक्सप्रेस पुढे काढली जाते. मासिक पासधारक व प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे राजेश फोकणे, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्वला कोल्हे, नितीन जगताप, सुदाम शिंदे आदींनी मुंबईत रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेतली.

गोदावरी साईडला टाकणे बंद करून गाडी वेळेत सोडण्याची मागणी केली. त्यानंतर गोदावरी नाशिकला येताना वेळेत पोहचत आहे. शिवाय तिची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. राजेश फोकणे आणि किरण बोरसे यांनी सांगितले की, गोदावरी स्पेशल मनमाडहून सकाळी 8.45 तर नाशिकहून 9.45 वाजता सुटते. मुंबईला जाताना ती वेळेत जाते. मुंबईहून निघाल्यावर नाशिकरोडला ही गाडी संध्याकाळी 7.10 पोहचते. गाडी वेळेत सोडल्यास ती कायम स्वरूपी सुरू राहील.

Related Stories

No stories found.