गोदामाई येईल आणि तिला जे न्यायचे ते घेऊन जाईल...

गोदामाई येईल आणि तिला जे न्यायचे ते घेऊन जाईल...

नाशिक | डॉ. वैशाली बालाजीवाले Nashik

यंदाही गोदावरीच्या पुराविषयी Godavari River Flood नाशिककरांच्या मनात कमालीची उत्सुकता अनुभवाला आली. दुतोंड्या बुडाला... रामसेतूला पाणी लागले... नारोशंकराच्या घंटेला पाणी लागेल का... होळकर पुलावरची वाहतूक बंद करतील का.... हाच दिवसभराच्या चर्चेचा सूर होता. धरणातून किती पाण्याचा विसर्ग सुरू आहे, हाही चर्चेचा मुद्दा बनला होता.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग Discharge of Water from Gangapur Dam टप्प्याटप्याने सुरूच होता. पाण्याची पातळी तासा-तासाला वाढत होती. पोलीस प्रशासन लोकांना निघून जाण्याचे आवाहन वारंवार करत होते. तथापि लोक पोलिसांना चुकवून पूर पाहण्यासाठी गल्लीबोळातून गोदाकाठावर जाण्याचा प्रयत्न करत होते.

गोदाकाठच्या वस्ती असंख्य पुरांंची साक्षीदार आहे. 1975 चा पूर बहुतेकांना आठवतो. श्री बालाजी मंदिराच्या पायर्‍या बुडून वर पाणी आले होते. मंदिराच्या चौकात पाणी शिरले होते. 2008 सालच्या पुराच्या आठवणी अंगावर आजही काटा आणणार्‍या आहेत. अगदी अर्ध्या-पाऊण तासात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. त्याविषयी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यावेळी गोदाकाठी राहाणार्‍यांना अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडावे लागले होते. त्यांच्या घरातील सर्वच सामानाचे नुकसान झाले होेते. त्यावेळी क्रेडाईसारख्या अनेक संस्थांनी, लोकांनी मदत केली. बालाजी मंदिरातच मदत केंद्र उभारले गेले. 32 घरांना सगळ्या प्रकारचे साहित्य पूरवले गेले. त्यात चमच्यापासून शिलाई मशिनपर्यंतचा समावेश होता. बालाजी संस्थानचा दवाखाना सुरुच होता.

गोदाकाठच्या सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले होते. तळमजल्यावरचे सगळे लोक मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आले होते. ते दोन दिवस त्या सर्वांच्या राहाण्या-खाण्याची सोय मंदिरातच केली होती. त्यावेळी पूर 24 तास राहिला होता. जेव्हा जेव्हा गोदेला पाण्याचा पूर येतो तेव्हा तेव्हा काठाकाठाला सद्भावनेचाही पूर येतो.

2016लाही असाच पूर आला होता. पाणी बालाजी मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंत आले होेते. जवळपास 75 हजार क्युसेस पाणी नदीतून वाहात होते. फक्त त्या पूराचे वेगळेपण असे होते की, पावसाचे पाणी प्रचंड होते. पुलाखालून जवळपास 25 हजार क्युसेस पावसाचे पाणी नदीपात्रात आले होते. ते रुप खूपच रौद्र होते.

आलाच तर वर्षातून एकदा येणारा पूर बघण्याची लोकांची उत्सुकता समजण्यासारखी आहे. तथापि दरवर्षी येणार्‍या या पुराला दुसरी बाजूही आहे. ती चिंतेची आणि काळजीची आहे. शहरातील मोठी लोकवस्ती पूर्वापार गोदाकाठी वसलेली आहे. नाशिककरांसाठी कमालीची उत्सुकता निर्माण करणार्‍या पुराची या लोकवस्तीने किती मोठी किंमत मोजली हे पूर ओसरल्यानंतरच लक्षात येते.

दरवर्षी पाणी येते.. पाणी येते आणि ते जाते तेव्हा पुराच्या पाण्याने केलेले नुकसान ठळक होते. ते पाणी अनेक दुकानांची शटर्स वाकवते. सामान वाहून जाते. इथली बहुतेक दुकाने लाकडाची आहेत. घरेही जुनी आणि लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर असलेली आहेत. लाकडी फर्निचर पाणी उद्ध्वस्त करते. ते दुरुस्त करायला फार खर्च येतो. घरांचे तलाव बनतात. सगळे सामान ओलेचिंब होते. त्यातील काही फेकूनच द्यावे लागते.

सगळीकडे चिखलाचा राडारोडा होतो. अगदी गुडघ्याइतक्या चिखलातून घर सावरायचे काम लोकांना करावे लागते. ते काम करताना पायाला चिखलातील वस्तू लागतात. क्वचित जखमा देखील होतात. परिस्थिती किंचित सुधारण्यासाठी देखील आठ-आठ दिवस लागतात. फेकून द्यायच्या सामानाचे अक्षरश: ढीग साचतात. ते उचलून नेण्यासाठी घंटागाडीसुद्धा भांडीबाजारात येऊ शकत नाही अशी स्थिती असते. घरांमध्ये त्याचा एकप्रकारचा वास भरुन राहातो. सारखे ओल्यात काम करावे लागल्याने रोगराई पसरण्याचा धोका असतो. किती आणि काय काय आवरणार? आणि दरवेळी पूर आल्यावर अशा परिस्थितीचा सामना करणे सोपे नसतेच. पाणी जेमतेम बारा तासच असते, पण त्यामुळे होणारे नुकसान बर्‍याचदा कधीही भरुन न येणारे असते.

पाऊस वाढायला लागला की नदीकाठी चिंता आणि भीती वाढायला लागते. नदीला वाढलेले पाणी बघायला खूप गंमत वाटते. पण नदीकाठी राहाणार्‍या लोकांना फक्त चिंता असते. पाणी किती वाढेल? कधी ओसरेल? त्यानंतर काय काय आवरावे लागेल? किती नुकसान होईल? अशा चिंतेने माणसे रात्रभर जागीच असतात. जेव्हा जेव्हा गोदेला पूर येतो तेव्हा तेव्हा गोदाकाठी असेच घडत असते.

गोदामाई वर्षातून एकदा येते. तिला आपण कसे थांबवणार? तिला यायचे तर येईल आणि तिला जे न्यायचे ते घेऊन जाईल..अशीच गोदाकाठच्या लोकांची भावना झाली आहे. ही भावना म्हणावी की हतबलता?

रस्ते उंच करुन ठेवलेत..नदीचे पात्र उंच करुन ठेवले आहेत. आजही जो काठ आहे त्यावर फरशा घालून तो भाग अजून उंच करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा फुगवटा वाढतोच ना! मग पाण्याचा निचरा कसा होणार? ते आजूबाजूलाच पसरणार.

नदीकाठी कामे करताना परिणामांंचा विचार कधी केला जाणार आहे का असा प्रश्न नदीकाठच्या लोकांना पडला आहे.

Related Stories

No stories found.