पाकमधून परतलेली गीता पालकांपासून वंचित

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

आई-वडिलांच्या शोधात पाकिस्तानातून भारतात आलेली गीता अद्यापही पालकांपासून वंचित आहे. त्यामुळे गीताचे खरे पालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. एकलहरे येथील रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. परिणामी त्यांचा डीएनए निगेटिव आला. त्याचप्रमाणे गीताला काल तिच्या आईचा फोटो दाखविण्यात आला. मात्र आपली आई फोटोमधील नसल्याचे गीताचे म्हणणे आहे. त्यामुळे गीताच्या खर्‍या आई-वडिलांचा अद्याप शोध लागत नसून गीता पालकांपासून वंचित आहे.

गीताला नाशिकरोडचे सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, आकाश भालेराव, गणेश उन्हवणे मदत करत आहेत. गीता सध्या 30 वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे 20 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये आढळली होती. दिवंगत परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परतली. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचा दावा केला होता.

गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असावी असा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीताचे समाधान झाले नाही. आपले घर हे रेल्वेस्थानकाच्या बाजूला मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचे गीताचे म्हणणं आहे. तसेच शेतामध्ये ऊस आणि भुईमुगाचे पीक असल्याचे वर्णन ती करते.

रमेश सोळसे यांचा दावा तपासण्यासाठी गीता व सामाजिक कार्यकर्ते नाशिकरोड पोलिस ठाण्यात गेले. वरिष्ठ निरीक्षक सूरज बीजली यांनी सत्य तपासण्यासाठी रमेश यांच्या पत्नीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रमेश यांची पत्नी शोभाने दुसरा विवाह केला असून, ती गीतासमोर आल्यास गीताची ओळख पटू शकते.

गीताचे हावभाव आणि इशार्‍यांवरून तिच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे. मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावे. गीता ही तेलुगू अभिनेता महेश बाबूची फॅन आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. लहानपणीच्या आठवणींव्दारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनार्‍यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणार्‍या परिसरात नेले गेले. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *