गमे, डॉ.पुलकुंडवार यांचा नाशिक सिटीझन्स फोरमकडून सन्मान

प्र-गती अभियानात विभागीय आयुक्तालय, मनपाची कौतुकास्पद कामगिरी
गमे, डॉ.पुलकुंडवार यांचा नाशिक सिटीझन्स फोरमकडून सन्मान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अर्थात प्र-गती अभियानामध्ये नाशिक विभागीय आयुक्तालयाला आणि नाशिक महानगरपालिकेला राज्यात पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा नाशिक सिटीझन्स फोरम सह विविध संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी गमे यांनी नाशिक महानगर विकास प्राधिकरणाबाबत तर डॉ. पुलकुंडवार यांनी नाशिक शहराचा विकास व सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन यावर उपस्थितांशी संवाद साधला.

द केन्सिंग्टन क्लब येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, अतिरिक्त आयुक्त रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आदी अधिकार्‍यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फोरमचे अध्यक्ष आशिष कटारिया, संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा, जीतूभाई ठक्कर, हेमंत राठी, डॉ. नारायण विंचूरकर, सुनिल भायभंग या माजी अध्यक्षांच्या हस्ते दोन्ही अधिकार्‍यांचा सत्कार करत मानपत्र प्रदान करण्यात आले.

नाशिक सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष आशिष कटारीया यांनी प्रास्ताविकात सन्मान सोहळा आयोजनामागची भूमिका मांडताना नाशिकचे नाव उंचावणारे हे दोन्ही पुररस्कार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गमे व डॉ. पुलकुंडवार यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची फोरमची आणि आणि सर्वच संस्थांची इच्छा असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

फोरमचे माजी अध्यक्ष जीतूभाई ठक्कर यांनी क्वालिटी सिटी नाशिक अभियानाची संकल्पना यावेळी उपस्थितांपुढे स्पष्ट केली. यासंदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत त्यांनी उपस्थितांना अवगत केले. तसेच नाशिक ही देशातील पहिली क्वालिटी सिटी म्हणून प्रमाणित करण्याच्या प्रयत्नांची दखल पंतप्रधान कार्यालयानेही घेतल्याचे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी सांगितल्याची माहिती जितूभाई ठक्कर यांनी यावेळी दिली.सुत्रसंचालन व मानपत्रांचे वाचन नाशिक सिटीझन फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अहिरराव यांनी केले. तर फोरमचे उपाध्यक्ष आर्कि. सचिन गुळवे यांनी आभार मानले.

आजवर बरेच पुरस्कार मिळाले. पण, आजचा सत्कार आपल्याच माणसांच्या हातून होत असल्यामुळे सर्वात जास्त भावला आहे. नाशिक शहर आज ना उद्या मेट्रो होणारच आहे. या वाढीच्या प्रक्रियेत नियोजनाचा अभाव असला शहरालगतच्या ग्रामिण भागाचा आणि शहराचा विकास परस्परपूरक असेल तर हे टाळता येते. म्हणूनच नाशिक महानगर विकास प्राधिकरण शक्य तितक्या लवकर कार्यान्वित होणे अत्यंत आवश्यक आहे.

सुरत-चेन्नई महामार्ग, मेट्रो, सेमी हायस्पीड रेल्वे अशा प्रकल्पांचा विचार करून प्राधिकरण क्षेत्रातील रस्त्यांचे जाळे कसे असावे, अन्य कामांचे भविष्यातील नियोजन कसे असावे याबाबत नगररचना संचालकांकडून एक आराखडा तयार करून शासनाकडे पाठवला आहे. नाशिकला सचिव दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून मिळेल या बाबी लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयासाठी त्र्यंबक रोडवरील दोन एकर जागेचा सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.

राधाकृष्ण गमे, विभागिय महसूल आयुक्त

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

फोरमने उचलून धरलेल्या क्वालिटी सिटी या संकल्पनेत कौशल्य विकासाचाही समावेश आहे. त्याअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या वागणुकीतही सौजन्य आणि कामात तत्परता आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील. शहराच्या विकासाचा वेग पाहता भविष्यात नागरी नियोजनाचा बोजवारा उडू द्यायचा नसेल तर आतापासूनच सर्वांनी मिळून संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आगामी सिंहस्थापूर्वी किमान नाशिक शहरातील जुने अंतर्गत, जुने मध्य आणि जुने बाह्य रिंग रोड पूर्णपणे विकसीत होण्याचे नियोजन करत आहोत. नविन बाह्य रिंगरोडचे काम रस्ते विकास महामंडळ अथवा तत्सम सक्षम आणि अनुभवी संस्थेकडून करण्याचे प्रस्तावित केले आहे. कारण महानगरपालिकेवर कर्ज नसले तरी 4585 कोटी रुपयांच्या दायित्वाचे ओझे आहे. तूर्त महानगरपालिकेच्या जुन्या रिंग रोडची अपूर्ण कामे, रुंदीकरण, सक्षमीकरण आणि मिसिंग लिंक जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

शहरामधून जाणार्‍या विविध महामार्गांवरील अपघातप्रवण स्थळांचा अभ्यास करून तिथेही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रस्ताव तयार करत आहे. नाशिकमध्ये पाण्याची गळती अर्थात नॉन रेव्हेन्यू वॉटर कसे शून्यावर आणता येईल यासाठी फोरमसारख्या संस्थांनी जागरूक राहिले आणि वेळप्रसंगी दबावही आणला पाहिजे. शहराच्या हद्दीबाहेर ओसाड डोंगर दत्तक घेऊन ते हिरवे करण्यासाठीही संस्थांनी प्रयत्न करावे

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त ,नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com