त्र्यंबकेश्वरसाठी 34 कोटींंचा निधी मंजूर

प्रदूषित पाणी गोदावरीत सोडण्याचे थांबणार
त्र्यंबकेश्वरसाठी 34 कोटींंचा निधी मंजूर
USER

मुंबई । प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत सोडले जाऊ नये यासाठी प्रस्तावित असलेल्या नगरपरिषदेच्या मल:निसारण (Sewage ) प्रकल्पाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाण्यामुळे गोदावरी नदी ( Godavari River) प्रदूषित होत होती. राष्ट्रीय हरित लवादाने याची दखल घेऊन राज्य सरकारला शहरात मल:निसारण प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा मान ठेवून त्रंबकेश्वर नगर परिषदेने 39 कोटी रुपयांच्या मल:निसारण योजनेचा विकास आराखडा तयार करून तो सरकारला सादर केला होता. राज्य शासनाच्या सनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर नगरविकास विभागाने या कामासाठी निधी मंजूर केला आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून दोन टप्यात तो वितरीत केला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 4.5 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी मलशुद्धीकरण प्रकल्पाची (एसटिपी) उभारणी करण्यात येणार असून दुसर्‍या टप्प्यात शहरात अंतर्गत मल:निसारण वाहिन्यांचे काम केले जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सांडपाणी शुद्ध होऊन नदीत सोडले जाणार असल्याने गोदावरी नदीच्या प्रदूषण पातळीत घट होण्यासाठी त्यांची मदत होणार आहे.

कार्यादेश मिळाल्यापासून दोन वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आदेश नगरपरिषदेला देण्यात आले आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी निधीचे पत्र स्वीकारले असून, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, बांधकाम समितीचे सभापती कैलास चोथे, त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल आणि अमित टोकेकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

कुंभमेळा आणि महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर शहराला भेट देतात.नद्या प्रदूषित होऊ नयेत ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारल्यास गोदावरी नदीतील प्रदूषण पातळीत नक्कीच घट होऊ शकेल. याच भूमिकेतून या योजनेसाठी निधी दिला आहे.

एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com