बागलाण तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

बागलाण तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

मुंजवाड | वार्ताहर | Munjwad

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) पर्यटनस्थळांच्या ( Tourist Places) ठिकाणी पायाभूत सुविधा (infrastructure) पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दुसर्‍या टप्प्यात पावणे १२ कोटी रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांनी दिली...

तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी (Development of Tourist Destination) पहिल्या टप्प्यात ७ कोटी ७९ लक्ष रुपयांची कामे मंजूर झाल्यानंतर आत्ता दुसर्‍या टप्प्यातही भरीव निधी प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा व पर्यटन संचालक बी.एन. पाटील यांच्या सहकार्यामुळे हा भरघोस निधी प्राप्त झाला असून तिसर्‍या टप्प्यातही १५० कोटींच्या साल्हेर येथील शिवसृष्टीसह हरणबारी धरण, अंतापूर व सटाणा येथील विकासासाठी लवकरच कोट्यावधींचा निधी प्राप्त होईल, असा विश्वासही आ. बोरसे यांनी व्यक्त केला.

बागलाण तालुका हा आदिवासीबहुल, कृषीप्रधान असला तरी तालुक्याला नैसर्गिक सौंदर्य, साधन संपत्ती आणि पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. यांचा वापर पर्यटनवाढीसाठी होऊन तालुका विकासाला मोठा हातभार लागू शकतो. त्यामुळेच तालुक्यातील ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही आ. बोरसे यांनी पुढे बोलताना सांगितले.

तसेच तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी तेथील पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठपुरावा (Follow UP) केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मुल्हेर किल्ला व श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ७ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी (Fund) मंजूर झाला होता.

आता दुसर्‍या टप्प्यात श्रीक्षेत्र आशापुरी माता देवस्थान नरकोळ येथील विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यातून या ठिकाणी परिसर सुशोभीकरण व अनुषंगिक कामे, वॉल कंपाऊंड, संरक्षक भिंत, कमान, घाट बांधकाम, सभामंडप, सुलभ शौचालय, भक्तनिवास आदी कामे होणार आहेत. सोबतच श्रीक्षेत्र दिगंबर जैन मांगीतुंगी येथे १ कोटी रुपयांतून विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहे. आसखेडा येथील खंडेराव मंदिराच्या विकासासाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील सुप्रसिद्ध शिव क्षेत्र दोधेश्वर येथेही मूलभूत सेवासुविधा व सौंदर्यकरण कामासाठी ५ कोटी लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साहजिकच दुसर्‍या टप्प्यात जवळपास पावणे १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तर तिसर्‍या टप्प्यात ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती, त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीस्तरावर आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्यात आला असून त्यासोबतच हरणबारी धरणावरील बोटिंग क्लबसाठी ५ कोटी तर अंतापूर येथील दावल मलिक देवस्थानच्या विकासासाठी ५ कोटी व सटाणा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही लवकरच मंजूरी मिळेल, असा विश्वासही आ. बोरसे यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com