
दिल्ली | Delhi
सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने अक्षरशः कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Disel Price), एलपीजीच्या (LPG) दरात वाढ झाल्यानंतर आता...
आणखी एक महागाईचा फटका बसला आहे. आज सीएनजी (Compressed Natural Gas, CNG) आणि पीएनजी (Piped Natural Gas, PNG) गॅसच्या दरात वाढ झाली आहे.
सीएनजी प्रतिकिलो ५० पैशांनी तर पीएनजी प्रतिकिलो १ रुपयाने महागला आहे. आजपासून (२४ मार्च) ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरवाढीनंतर पीएनजी गॅस ३६.६१ रुपयांऐवजी ३७.६१ रुपये प्रति एससीएमने उपलब्ध होणार आहे.
सीएनजी प्रतिकिलो ५० पैशांनी वाढल्यामुळे दिल्लीकरांना आता सीएनजीसाठी गुरुवार पासून ५९.०१ रुपयांऐवजी ५९.५१ रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहेत.
रशिया-युक्रेन युध्दामुळं (Russia-Ukraine War) इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पीएनजीच्या किंमतीपूर्वी सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) किमतीत वाढ झाल्यामुळं इंधनाच्या दरातही वाढ दिसून आलीय.
दरम्यान दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोल ९७.०१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.२७ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.
मुंबईत पेट्रोलच्या किमतीत ८५ पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोल १११.६७ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.
दिल्ली, मुंबई सहित इतर शहरांमध्ये घरघुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मंगळवार पासून ५० रुपयांची वाढ केली आहे. या महागाईमुळे आता सर्वसामान्य कुटुंबांमधील महिन्याचे बजेट कोलमडले आहे.