अपहरण, खंडणी गुन्ह्यातील चौघे गजाआड

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

२० लाखांच्या खंडणीसाठी निमगुले येथील व्यक्तीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. अवघ्या २४ तासांच्या आत मालेगाव तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उलगडला. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. तर अपहृत व्यक्ती सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे…

अधिक माहिती अशी की, प्रविण केशव कदम, (रा. निमगुले, ता. मालेगांव हल्ली मुक्काम खुटवड नगर, नाशिक) (दि.27) त्याच्या दोन मित्रांसह निमगुले, ता.मालेगाव येथुन कौळाणे येथे जेवणासाठी आलेला होता.

जेवण करुन रात्री साडेदहाच्या सुमारास नांदगांव फाटा कौळाणे येथुन ते निमगुले येथे जाण्यासाठी निघाले असता कदम यांच्या कारसमोर वाहन आडवे करत कदम याच्या दोघा मित्रांसह त्यासही गाडीत घालण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, कदम यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले तर कदम यांचे अपहरण करत काही क्षणातच संशयित पसार झाले.

दरम्यान, कदम यांचा नाशिक येथे राहणाऱ्या अमित पगार व त्याच्या इतर 07-08 साथीदारांनी कदम यांचे अपहरण केले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

यानंतर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरण व दरोड्याचा गुन्हा दाखला करण्यात आला होता. दरम्यान, नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनेची गंभीर दाखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी त्यांच्या पथकासह सदर आरोपींचा व अपहृत व्यक्तीचा नाशिक शहरात कसोशीने शोध घेणे सुरु केले.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा अमित पगार, (रा. इंदिरा नगर, चेतना नगर, नाशिक याने त्याचे साथीदार प्रणव बोरसे, कुणाल बागुल, गोकुळ गणेशकर व त्यांच्या इतर साथीदारांसह केलेला असल्याचे समजले. हे सर्व संशयित त्र्यंबकेश्वर परिसरात असल्याचे समजले.

यानंतर सर्व ताफा त्र्यंबकच्या दिशेने निघाला. याच वेळी सर्व संशयित तळवाडे फाटा येथील हॉटेल शिवस्वप्नपुर्ती यात लपुन बसले असल्याचे समजले. याठिकाणी छापा घातला असता अपहृत प्रविण कदम व अपहरण करणारे 04 संशयित मिळुन आले.

1) अमित राजेंद्र पगार, वय- 30, रा. सई अपार्टमेंन्ट, इंदिरा नगर, चेतना नगर, नाशिक, 2) प्रणव तुकाराम बोरसे, वय- 30, साई समृध्दी पार्क, उपनगर, नाशिक, 3) प्रकाश अरुण सोनवणे, वय- 29, रा. माउली नगर, नाशिक, 4) कुणाल विजय बागुल, वय- 27, रा. दत्तप्रसाद रो-हाउस, खुटवड नगर, नाशिक अशी आहेत. तर इतर चार संशयित घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, अधिक चौकशी केली असता चार वर्षांपूर्वी आम्ही व आमच्या इतर नातेवाईकांनी प्रविण कदम यांच्या सांगण्यावरून फयुचर मेकर प्रा.लि. कंपनी हिस्सार या कंपनीत 10 ते 12 लाख रुपये गुंतवणुक केलेली होती. त्यानंतर ती कंपनी बंद पडली होती.

वारंवार प्रविण कदम याच्याकडे पैशांची मागणी करीत होतो परंतु तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करीत होता. म्हणुन आम्ही (संशयित) काल सायंकाळी निमगुले येथे जात त्याचा शोध घेतला होता परंतु तो आम्हाला मिळुन आला नव्हता नंतर तो आम्हाला कौळाणे येथे मिळुन आल्याने आम्ही त्याचे अपहरण करुन त्याला गाडीत टाकुन घेवुन आलो होतो.

त्यानंतर त्याला सोडून देण्याच्या मोबदल्यात त्याच्या घरच्याकडे 20 लाख रूपये खंडणीची मागणी केली होती. अशी कबुली गुन्ह्यातील संशयितांनी दिली. यानंतर सर्व संशयितांना मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे नेण्यात आले.

गुन्हयांतील आरोपी प्रणव बोरसे, रा. खुटवड नगर, नाशिक याच्यावर नाशिक शहरात अंबड, सरकारवाडा, सातपुर, गंगापुर तसेच नाशिक ग्रामीण जिल्हयात सटाणा येथे चोरी, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी, खुन या सारखे 16 ते 17 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस अंबड पोलीस ठाणे कडील खुनाचे प्रयत्नासह आर्म अ‍ॅक्टच्या गुन्हयात सन 2017 मध्ये 07 वर्षांची शिक्षा झालेली असुन सदरचा आरोपी हा करोना कालावधीत जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नाशिक रोड येथुन पॅरोल रजेवर सुटलेला आहे.

पॅरोल रजेच्या कालावधीत त्याने त्याचे साथीदारांसह सदरचा गुन्हा केलेला आहे. तसेच यातील आरोपी कुणाल बागुल, रा. खुटवडनगर, नाशिक याच्यावर त्र्यंबक व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

आरोपी प्रकाश सोनवणे, रा. पाथर्डीफाटा, नाशिक याच्यावर सातपुर व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणेस मालाविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.

स्थागुषाचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, सपोउनि रवि शिलावट, पोहवा दिपक आहिरे, पोना संदीप हांडगे, जालिदंर खराटे, हेमंत गिलबिले, पोकॉ लहु भावनाथ, भाउसाहेब टिळे, प्रदिप बहिरम, संदिप लगड, योगेश गुमलाडू, भूषण रानडे यांचे पथकाने सदर अपहरणाच्या गुन्हयाचा कसोशिने तपास करून आरोपीतांना 24 तासाच्या आत ताब्यात घेवुन अपहृत इसमाची सुटका करण्यात आलेली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *