नाशिक : माजी रणजीपटू शेखर गवळी दरीत कोसळले; शोधमोहीम सुरु

Breaking news
Breaking news Breaking news

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरी तालुक्यात भटकंतीसाठी गेलेले माजी रणजीपटू व महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी पाय घसरून दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली...

आज सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच इगतपुरी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण करून शोधमोहीम हाती घेण्यात आली.

तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ शोधमोहीम राबविण्यात आल्यानंतर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी 'देशदूत'शी बोलताना दिली.

ते म्हणाले, माजी रणजीपटू गवळी यांच्यासोबत काही सहकारी इगतपुरी परिसरात ट्रेकिंगसाठी आलेले होते. खोल दरीच्या कडेला गवळी फोटो काढत असावेत याच दरम्णेयान त्यांचा पाय घसरून ते खोल दरीत कोसळले असावेत असा अंदाज आहे.

इगतपुरीमध्ये सध्या संततधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे डोंगराळ भागात लहान मोठे अनेक ओहोळ याठिकाणी वाहत आहेत. गवळी ज्या ठिकाणी कोसळले त्याच ठिकाणी एक ओहोळ दुथडी भरून वाहतो, तसेच या दरीची खोली २५० फुटापेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. गवळी हे महाराष्ट्र रणजी संघाचे प्रशिक्षक देखील असल्याचे समजते.

प्रत्यक्षदर्शिंकडून माहिती मिळवून स्थानिक पोलीस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले होते. मात्र, अंधार पडल्याने उद्या सकाळी पुन्हा आपत्ती विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या घटनेचा गणेश विसर्जनाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com