
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकून अॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांचे कटकारस्थान उघडकीस आणले होते. त्यानंतर राज्यभरात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी पावणेदोन कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मविप्र संस्थेसी संबंधित जळगावात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अॅड. चव्हाण यांच्यासह सहा संशयितांची (accused) नावांसह दरोड्याच्या (Robbery section) गुन्ह्याचे कलम देखील वाढविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी यासाठी दबाव टाकून अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करत त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा पुणे कोथरुड पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर कोथरुड पोलिसांचे पथक निलेश भोईंटेच्या घरावर छापा टाकण्यासाठी आले होते. यावेळी संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन या प्रकरणासंबंधितचे दस्ताऐवज दाखल करायचे आणि पोलीसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या सूरा ठेवण्याचा कट रचला होता. तसेच वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती दिली होती.
भोईटेंच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि. 7 ऑक्टोंबर 2022 रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींसह दरोड्याचे कलमही वाढविले
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनिल दत्तात्र्य माळी या संशयिताची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच या खटल्यात संशयितांवर दरोड्याचे कलम वाढविण्यात आले आहे.
बंदोबस्तातील पोलिसांसमोर झाला संपुर्ण प्रकार
तक्रारदाराने पोलिसात दिलेल्या तक्रानुसार घटना घडलेल्या दिवशी कोथरुड पोलिसांनी शहर पोलिसांकडे पोलिस बंदोबस्त मागितला होता. त्यानुसार पोलिसांच्या बंदोबस्तात पोलिसांनी निलेश भोईटेंच्या घरावर छापा टाकला होता. पोलिसांसमोर हा सर्व प्रकार झाल्याने पोलिसही त्यांना रोखू शकले नसल्याचा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.
बीएचआर खंडणी प्रकरणात एसआयटीचे पथक चाळीसगावात
पोलीस मुख्यालयातील एसआयटीच्या कार्यालयात गुरुवारी सुरज झंवर यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. या पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादी सुरज झंवर यांचे वडील सुनील झंवर नोंदविला. तसेच झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही एसआयटीने ताब्यात घेतले आहे. तसेच दुपारी हे पथक संशयित उदय पवार याच्या शोधार्थ एसआयटीचे पथक चाळीसगावात पोहचले होते. परंतू संशयित मिळून आला नसल्याचे कळते.