
मुंबई | Mumbai
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (Financial Misappropriation Case) तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांनी केला आहे. कदम यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा करत अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली...
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवार यांना तुरुंगातून (Jail) ब्लॅकमेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करत असल्याचा दावा कदम यांनी केला. तसेच मी तुरुंगात असतांना छगन भुजबळ यांच्याशी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला (Bail) खूपच उशीर होत आहे असं म्हणत नाराजी बोलून दाखवायचे, असेही कदम यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सत्तेतील आणि तुरुंगातील छगन भुजबळ यांच्यात खूप फरक आहे. छगन भुजबळ तुरुंगात असतांना रोज आजारी पडायचे. काकुळतीला यायचे त्यांना रोज उपचाराची गरज होती. तुरुंगातून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही छगन भुजबळ यांच्या छातीत दुखत आहे. तुरुंगात गेलं की लोक आजारी पडतात त्यांना माहीत आहे. सहानुभूती मिळवून कसा जमीन मिळवायचा हे देखील त्यांना माहित आहे. परंतु, तुरुंग हे कोणाच्या नशिबात येऊ नये नरक आहे, असेही रमेश कदम यांनी म्हटले.
रमेश कदम कोण आहेत?
रमेश कदम हे राष्ट्रवादीचे माजी आमदार असून त्यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये ३१२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर कदम यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. नुकताच त्यांना न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी सर्व गुन्ह्यांमधून जामीन मंजूर केला आहे. रमेश कदम यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. तसेच मोहोळमध्ये परतल्यानंतर कदम यांचे त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी आज पंढरपुरात जाऊन विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.