माजी आमदार जयप्रकाश छाजेड अनंतात विलीन

माजी आमदार जयप्रकाश छाजेड अनंतात विलीन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, इंटकचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश जितमल उर्फ दादा छाजेड (Late Jayprakash Chhajed )यांच्या पार्थिवावर येथील अमृतधाममध्ये साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ज्येष्ठ चिरंजीव प्रितिश यांनी त्यांना अग्निडाग दिला.आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देतांना अनेकांना अश्रू अनावर झाले.

मंगळवारी (दि.10) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराने जयप्रकाश छाजेड यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.त्यांची अंत्ययात्रा त्यांचे सुचितानगर येथील निवासस्थान येथून निघाली. त्यानंतर त्यांचे पार्थिव देह महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.यावेळी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांनी हजेरी लावली.

छाजेड यांच्या निधनाने ज्येष्ठ नेता हरपला असून कुटुंबाला आणि काँग्रेस पक्षाला देखील धक्का बसल्याची शोकभावना मान्यवरांनी व्यक्त केली. दोन ते तीन वर्षांपासून छाजेड यांना आजारांना सामोरे जावे लागले होते. मध्यंतरी ते मुंबईला लीलावती रुग्णालयातदेखील दाखल होते. नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीस जाणार होते, मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना कुटुंबियांनी जाऊ दिले नाही.

रात्री मुलाशी बोलतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर मुंबई नाका येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते.मात्र, तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. छाजेड यांच्या पश्चात पत्नी, नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा माजी नगरसेवक आकाश, प्रितिश, सुना,नातवंडे तसेच बंधू नरेंद्र छाजेड, भगिनी ज्योत्स्ना पुराणिक, शोभा व्होरा असा मोठा परिवार आहे.

नाशिकच्या राजकारणातील प्रभावी नेता

नाशिकच्या राजकारणात प्रभावी मानले जाणारे छाजेड हे युवक काँग्रेसचे शहराध्यक्षही होते. प्रदेश काँग्रेसवरही त्यांनी काम केले. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापतिपदही त्यांनी भूषवले होते.त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचे अत्यंत ते निकटवर्तीय होते. छाजेड यांची विधान परिषदेत आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. इंटकचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एसटी महामंडळातील अनेक संघटना एकत्र करून कामगारांचा लढा दिला. या माध्यमातून त्यांनी एसटी कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास हातभार लावला. नाशिकमध्ये शाहीर परिषद भरविण्यात त्यांचा वाटा होता. नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

काँग्रेस भवनात अंत्यदर्शनासाठी रांगा

महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवनात छाजेड यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री,नितीन राऊत, अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख,आमदार उल्हास पवार,माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार वसंत गिते,बाळासाहेब सानप,शिरीषकुमार कोतवाल, संजय चव्हाण,सुरेश भटेवरा,डॉ. तुषार शेवाळे,शरद आहेर,विजय साने, हेमंत धात्रक, राहुल दिवे,गुरमीत बग्गा, परवेज कोकणी,सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, दिनकर पाटील,डॉ. हेमलता पाटील, गिरीश पालवे, माजी महापौर यतीन वाघ, राजेंद्र बागुल, सतीश शुक्ल, भास्करराव बनकर,प्रथमेश गिते, लक्ष्मण सावजी, गोकुळ पिंगळे, रमेश कहांडोळे,महेश हिरे,बाळासाहेब गामणे,वसंत ठाकूर,विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com