नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (दि.13 ) रोजी नाशिक दौर्यावर येत आहे. नाशिक शहरातील भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत गेल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेऊन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडवणीस यांच्याकडुन विशेष उपाय योजना केल्या जाणार आहे. तसेच फडवणीस हे शहरातील खाजगी कार्यक्रमांना हजेरी लावणार असुन त्यांच्या स्वागताची मोठी जय्यत तयारी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.

नाशिक शहरात भाजपला मोठा धक्का देण्याचे काम शिवसेनेकडुन झाले असुन भाजप प्रदेश कार्यकारिणीसदस्य माजी आ. वसंत गिते व सुनिल बागुल यांची घरवापसी झाली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर शहर भाजपवर कोणता परिणाम होईल व भविष्यात अशाप्रकारे पदाधिकारी - नगरसेवक पक्ष सोडणार नाही, यसांदर्भात फडवणीस आजच्या नाशिक दौर्यात स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करणार आहे.

फडणवीस यांचे अनेक महिन्यानंतर नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी भाजपने केली आहे. पाथर्डी फाटा येथून मोठ्या जल्लोषात स्वागत झाल्यानतंर मोठ्या जत्थ्यासह ते शहरात येणार असुन जागोजागी त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

दुपारी 2 वाजता माजी संघटनमंत्री नाना नवले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन, दुपारी 3.30 वाजता पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा, तर सायंकाळी 5.30 वाजता देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ होणार आहे. अशाप्रकारे फडणवीस यांच्या दिवसभरातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.