सामाजिक शिस्तीचे पालन करा - पंतप्रधान
मुख्य बातम्या

सामाजिक शिस्तीचे पालन करा - पंतप्रधान

करोनाबाबत सावधगिरीची माहिती देण्यासाठी व्यापक प्रचारमोहीम राबवा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | new delhi - देशात करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शिस्त व नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशातील करोनाच्या वाढत्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आयोजित बैठकीत मोदी बोलत होते. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, मंत्रिमंडळ सचिव तसेच नीती आयोगाचे सदस्य आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोदी म्हणाले , व्यक्तिगत स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अनुशासनाचे पालन करण्याचा आग्रह आम्ही धरला पाहिजे. त्याचप्रमाणे करोनाबाबत सावधगिरीची माहिती देण्यासाठी व्यापक प्रचारमोहीमही राबवायला हवी. करोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक या उपाययोजना केल्या पाहिजे, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे.

करोनाबाधितांची संख्या वाढत असलेल्या राज्यात तसेच महानगरात उपचारात तसेच नियंत्रणात राष्ट्रीय स्तरावरून देखरेख करण्याची सूचना मोदी यांनी केली.

राजधानी दिल्लीतील करोनाची स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा करीत, असेच संघटित प्रयत्न राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी संबंधित राज्यांनी केले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले. अहमदाबाद शहरात करोना रुग्णांची देखरेख आणि घरोघरी जाऊन बाधितांवर उपचार करण्यासाठी राबवण्यात येणार्‍या धन्वतंरी रथाचे मोदी यांनी उदाहरण दिले. अन्य राज्यांनीही हा उपक्रम राबवण्याची सूचना मोदी यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com