नाशकात धुक्याची चादर; आजपासून तापमान घसरणार

नाशकात धुक्याची चादर; आजपासून तापमान घसरणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर व जिल्ह्यात गुरुवारी (दि.5) सलग दुसर्‍या दिवशीही वातावरणातील गारठा कायम होता. तसेच संपूर्ण दिवसभर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हे वातावरण आता निवळणार असून शुक्रवारी यामध्ये पूर्णत: बदल झालेला दिसून येणार आहे. यानंतर आता कमाल तापमान कमी होऊन किमान तापमानात घसरण होणार आहे.त्यामुळे थंडीमध्ये वाढ होणार आहे. वातावरण निवळण्याबरोबरच थंडीत वाढ होणार असल्याने शेतकरी विशेषत: द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण राहणार आहे.

मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातही तरीदेखील किमान तापमान सरासरीपेक्षा काहीसे घसरलेलेच असून थंडीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवतच आहे.पश्चिमी झंझावाताची व्यापकता उत्तर भारताबरोबरच दक्षिण मध्य प्रदेशातील बारवणी, निमर, बेतुल, बुर्‍हाणपूर, छिन्दवाडा, बालाघाटपर्यन्त पोहोचल्यामुळे तसेच उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ ते विदर्भातील बुलढाण्यापर्यन्त पसरलेल्या व जमिनीपासून दीड किमी उंची पर्यंतच्या हवेच्या कमी दाबपट्टा क्षेत्रामुळे व जमिनीलगत असलेली आर्द्रता व थंड, मंद झुळूक वारा ह्या सर्व एकत्रित वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात दोन दिवसाकरिता ढगाळ वातावरण व पाऊस हा झालेला बदल शुक्रवार (दि.6)पासून निवळेल.त्याचबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.

सध्या देशाच्या भुभागावर एक पास होत असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबर अजुन दोन पश्चिमी झंजावात लाईनमध्ये असून एका पाठोपाठ ते देशाच्या उत्तरेकडील राज्यात मार्गस्थ होऊन महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव टिकून ठेवतील. तसेच पुढील काही दिवसात किमान तापमानात सध्यापेक्षा अधिक हळूहळू घसरण होऊन हवेत गारवा वाढण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com