
नवी दिल्ली | New Delhi
जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दोडा जिल्ह्यातील (Doda District) आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रवासी बस किष्टवाडवरून जम्मूकडे जात होती. त्यावेळी ही दोडा जिल्ह्यातील असार भागाजवळ असलेल्या त्रंगलजवळ आली असता २५० मीटर खोल दरीत कोसळली. यावेळी बसचा अपघात होऊन पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे. तर या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Minister Jitendra Singh) यांनी 'एक्स'वर (ट्वीट) माहिती देतांना म्हटले की, जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात किश्तवार आणि जीएमसी डोडा येथे हलवण्यात येत आहे. अधिक जखमींना हलविण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.