भूसंपादन घोटाळ्याच्या चौकशीचा पहिला टप्पा पूर्ण

महापालिका वर्तुळात खळबळ
 भूसंपादन घोटाळ्याच्या चौकशीचा पहिला टप्पा पूर्ण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत ( NMC )गत दोन वर्षांमध्ये झालेल्या सुमारे आठशे कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याच्या (Land acquisition scam ) चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीने तपासाला सुरु केली असून पहिला टप्पा पूर्ण करून पथक पुण्याला रवाना झाले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडे 24 विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करून त्यांची पूर्तता करण्याचे आदेश समितीने दिले आहे. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक महापालिकेच्या विविध विभागाशी संबंधित या 24 प्रकारच्या फाईली तसेच बारीक सारीक कागदपत्रांची माहिती तपास पथकाने मागितली आहे. महापालिका प्रशासन अधिकार्‍यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तपास पथकाने यापूर्वीच सुमारे 65 फाईल्स आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

त्याचप्रमाणे शहरातील ज्या भागांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे, त्या भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी देखील तपास पथकाने केली आहे. तसेच पथकाने काही ठिकाणी फोटोग्राफी केली असून ज्या ठिकाणी गरज पडली तिकडे व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याची चर्चा सुरू असली तरी तपास पथकाच्या अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

नगर रचनाच्या चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखा देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. कारण मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. तसेच भूसंपादन करण्यासाठी जो पैसा देण्यात आला. त्यासाठी महापालिकेचा राखीव निधी तसेच कर्मचार्‍यांसाठीचा राखीव निधी देखील तोडण्यात आला आहे. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी रोख रक्कम देखील देण्यात आल्यामुळे हा संशयास्पद व्यवहार आर्थिक गुन्हे शाखा तपास करू शकते.

भूसंपादन संदर्भातील सुमारे 65 ठरावांची बारीकसारीक माहितीही समितीने गोळा केल्याचे समजते. यामध्ये ठरावावर सूचक, अनुमोदक कोण होते, याबाबत देखील विचारणा करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या भुसंपादन चौकशी समितीचे कामकाज सुरूच असून समितीला ्ज्या स्थळांची पहाणी करणे आवश्यक वाटले त्या स्थळांची पहाणी समिती सदस्यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com