कमी जागेतील इमारतींचे 'फायर ऑडीट' बंधनकारक

मास्टर मॉल आग प्रकरणानंतर मनपाला जाग
कमी जागेतील इमारतींचे 'फायर ऑडीट' बंधनकारक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील गंजमाळ परिसरात ( Ganjmal Area) मास्टर मॉल ( Master Mall ) या तीन मजली इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तुंच्या आग ( Fire )लागली होती. ही आग विझवताना अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागली होती. याची दखल घेऊन मनपा आयुक्तांनी शहरातील अडचणीच्या ठिकाणी असलेल्या सर्व इमारतींचे आग परीक्षण (Fire Audit) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मास्टर मॉल ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात उभी राहिलेली होती तर त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वाहनांना जाण्यासाठीदेखील जागा नव्हती. त्याचप्रमाणे मोकळी हवा देखील मिळत नव्हती. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

दरम्यान आता मनपा प्रशासनाने शहरातील सर्व अशा धोकादायक दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक इमारतींची चौकशी करण्याचे ठरवले आहे. मनपाकडून फक्त नोटिसांचे सोपस्कार पार पाडले जातात. प्रत्यक्षात फायर ऑडिट न करणार्‍या इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यासारखी कारवाई होत नाही.

यापूर्वी राज्य शासनाने पालिका क्षेत्रातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंधरा मीटर उंच रहिवासी इमारत, शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट, रुग्णालये, बहुमजली व्यावसायिक इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, व्यावसायिक इमारती, सिनेमागृहे, मंगल कार्यालय, औद्योगिक इमारत, गोदामे, नाट्यगृह, सिनेमागृहांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे.

मात्र अनेेक इमारतीत ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे काही घटना घडल्यास मोठी अडचण निर्माण होते. शहरातील अशा सर्व इमारतींचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com