औद्योगिक वसाहतीमधील गोदामाला आग; लाखोंचा माल भस्मसात

दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण
औद्योगिक वसाहतीमधील गोदामाला आग; लाखोंचा माल भस्मसात

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथील औद्योगिक वसाहतीमधील संचेती वेअर हाऊसच्या गोदामाला लागलेल्या आगीत लाखोचा माल भस्मसात झाल्याची घटना आज दुपारी घडली.

जऊळके दिंडोरी येथील औद्योगिक वसाहतीमधील गट क्रमांक 217/2 मधील वर्धमान राजेंद्र संचेती यांच्या मालकीचे संचेती वेअर हाऊस आहे. या गोडाऊनमध्ये अनेक कंपन्यांचा माल ठेवण्यात येत होता. परंतु आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोडाऊनमधील मारुती इंडस्ट्रीज या कंपनीने तयार केलेले अत्तर व सुगंधीत द्रव्याच्या बाटल्यांना अज्ञात कारणाने आग लागल्याने परिसरातील कर्मचार्‍यांची एकच धावपळ सुरू झाली.

औद्योगिक वसाहतीमधील गोदामाला आग; लाखोंचा माल भस्मसात
नाशिकहून 'या' पाच शहरांसाठी विमानसेवा सुरु

थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने वेअर हाऊसमधील सीएट कंपनीचे टायर ठेवलेले गोडाऊनदेखील आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने आगीने मोठे रूप धारण केले होते. परिसरात आगीमुळे धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरातील सरस्वतीनगर व दहावा मैल परिसरापर्यंत धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या वतीने मोहाडी मंडळ अधिकारी नंदकुमार गोसावी, जानोरीचे तलाठी किरण भोये, जऊळके दिंडोरीचे उपसरपंच तुकाराम जोंधळे यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. नाशिक महानगरपालिका, ओझर एअर फोर्स व पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशमन बंबांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली

आगीत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला. त्यामध्ये मारुती इंडस्ट्रीजच्या सुगंधीत अत्तर व सीएट कंपनीच्या टायरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, उपसरपंच तुकाराम जोंधळे, विजय जोंधळे, पोलीस पाटील श्रीधर गांगुर्डे व ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी व जानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या व वेअर हाऊस आहे. या परिसरात आगीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यासाठी नाशिक महानगर प्राधिकरणाने नवीन बांधकामांना परवानगी देताना अग्निशमन प्रतिबंधक योजना करणे गरजेचे आहे.

तुकाराम जोंधळे, उपसरपंच, जऊळके दिंडोरी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com