नाशिक ।प्रतिनिधी Nashik

नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात सुरू होणार्या नाशिक महानगरपालिका बस सेवेच्या प्रवासाकरिता 2 कि. मी. या पहिल्या टप्प्याचा तिकीट दर दहा रुपये असणार असुन याकरिताच मुलांना आणि वृध्दांना सवलतीच्या दरात 5 रुपये तिकीट असणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज (दि.29) घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नाशिक महानगर परिवहन महांमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळाची मासिक सभा अशा दोन सभा आज आयुक्त जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यात संचालक मंडळांमार्फत विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबतची माहिती आयुक्तांनी पत्रकारांना दिली. शहरातील एस. टी. महामंडळाची स्थानके हे शेअर बेसीसवर महापालिकेला वापरण्यास परवानगी एस. टी. महामंडळाने दिली आहे.

तसेच परिवहन सेवा सुरु करण्यासाठी लागणारी परिवहन विभागाची परवानगीसाठी व्यवस्थापकीय संचालकांशी पत्रव्यवहार करण्यात आला असुन याची परवानगी काही दिवसात मिळेल, तसेच एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडुन बस सेवा सुरु करण्यासंदर्भातील ना हरकत दाखला लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील पंचवटीतील तपोवन विभागात होणार्या बस डेपोच्या कामाच्या निवीदा प्रक्रियेत एल वन यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे आता आम्ही एलटू निवीदाधारकांस बोलून एल वनच्या दरात काम करणार का ? अशी विचारणा करुन पुढील निर्णय घेणार आहे.

तर नाशिकरोड येथील डेपोच्या कामाचा कार्यादेश देण्यात आला आहे. अशाप्रकारे बससेवा कामांंना गती देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

महापालिका शहर बससेवा प्रवासाकरिता 2 कि. मी. च्या पहिल्या टप्प्याकरिता 10 रुपये असे भाडे ठरविण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर पुढील टप्प्यातील तिकीट दर देखील निश्चित करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्याकरिता वृध्द व बालकांना अर्धे तिकीट अर्थात 5 रु. अशी तिकीट आकारणी केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात शहरात डिझेलवर चालणार्या 50 बसेस सुरू करण्यात येणार आहे. सध्या बहुतांशी शाळा ऑनलाईन स्वरुपात सुरू असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असणार असुन जुन - जुलै 2021 या नवीन शैक्षणिक वर्षानंतर गर्दी लक्षात घेऊन बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सागितले.