Thursday, April 25, 2024
Homeनाशिककर्जपुरवठा न करणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल करा : कृषीमंत्री दादा भुसे

कर्जपुरवठा न करणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल करा : कृषीमंत्री दादा भुसे

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील बँकांना शेतीपीकासाठी २५० कोटी रू. कर्जवाटपाचे उद्दीष्ट दिलेले असतांनाही फक्त ११३ कोटी रू. वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित आठ दिवसात हे सर्व पीककर्ज वाटप झाले पाहिजे. बँकांना शेतकर्‍यांचे पैसे डिपॉझिट म्हणून चालतात. मात्र हेच पैसे शेतकर्‍यांना कर्ज वाटतांना बँक हात आखडता घेतात. त्यामुळे कर्जवाटप न करणार्‍या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा सूचना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत.

- Advertisement -

निफाड पं.स. सभागृहात कृषीमंत्री दादा भुसे यांनी तालुक्याचा कृषी आढावा घेतला. यावेळी उपस्थित शेतकरी, अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना ना. भुसे बोलत होते. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, प्रांत डॉ.अर्चना पठारे, मा.आ. अनिल कदम, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, पो.नि. रंगराव सानप आदींसह कृषी अधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी, सेवक, पं.स. सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी ना. भुसे म्हणाले की, पुढचा काळ हा शेतीचा आहे. गटशेती व फार्मर शेतीसाठी प्रोड्यूसर कंपनीने पुढे यावे. शेतकर्‍याला सशक्त करणे गरजेचे आहे. फळबाग लागवड, शेततळे, अस्तरीकरण यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच शेतकर्‍यांसाठी लहान-लहान कृषी औजारे उपलब्ध करून देण्यात येतील. निकृष्ठ खते व बीयाणे पुरवठा करणार्‍या २५ कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले असून पहिल्यांदाच सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच व्यापारी व व्यवसायिकांनी योग्य दरात व लिंकिंंग न करता शेतकर्‍यांना खते व बीयाणे पुरवावी. शेतकर्‍यांना खते कमी पडू नये यासाठी ५० मे. टन अतिरिक्त स्टॉक करण्यात येत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना अडचण येणार नाही.

कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेला ९८० कोटी रू. प्राप्त झाले असून हा मोठा निधी शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण आपल्या सर्वांचा उत्तरदायी शेतकरी आहे. त्याच्या समाधानात आपले समाधान आहे. कृषीबाबत स्थानिक पातळीवर प्रश्न सुटत असेल तर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. २ लाख रूपयांच्या आत कर्ज असणारे ३ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यांचे १२ हजार कोटी वर्ग करण्यात आले असल्याचे दादा भुसे म्हणाले.

यावेळी आ. बनकर म्हणाले की, शेतकरी हाच आपला पक्ष हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. तालुक्यातील ज्या सोसायट्यांनी शंभर टक्के कर्जफेड केले त्यांना पुन्हा कर्जपुरवठा करावा. सर्वांना कर्जमाफी देण्याचे धोरण शासनाचे आहे. ज्यांनी रेग्यूलर कर्ज भरले त्यांनाही ५० टक्के अनुदान मिळणार आहे. तालुक्यात साडेसतराशे कोटी रू. कर्ज वाटप करण्यात आल्याचे आ. बनकर म्हणाले. यावेळी शेतकर्‍यांनी विचारलेल्या प्रश्नांना ना. भुसे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या