जिल्ह्यात लाखांचेे लसीकरण वाया जाण्याची भीती

कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळत नसल्याने वृद्धांची वणवण, संताप
जिल्ह्यात लाखांचेे लसीकरण वाया जाण्याची भीती

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत असतानाच राज्य शासनाने कोव्हॅक्सीन लसीचा डोस केवळ 18 ते 44 वयोगटासाठीच वापरण्याचे निर्देश दिले असल्याने या लसीच्या दुसर्‍या डोससाठी वृद्धांची गेल्या आठ दिवसांपासून वणवण सुरू आहे. दुसरा डोस न मिळाल्यास त्यांचे पहिले लसीकरणही वाया जाणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तसेच 18 ते 44 वयोगटालाही लस सुरू केल्याने लसींची मागणी वाढली आहे. तर त्या तुलनेत लसींचे उत्पादनच नसल्याने सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने लसीबाबत हात आखडता घेतल्याने राज्य शासनाने लस विकत घेतली आहे. परंतु कोठेही पुरेसा साठा नसल्याने लसीकरण थांबे घेतच सुरू आहे.

18 ते 45 वयोगटाचे लसीकरणास प्राधान्य देण्याच्या निर्णयाच्या परिणामी अनेक ठिकाणी अनेक केंद्रांवरील 45 वर्षांवरील लसीकरण बंद करण्याचा धडाका लावल्याचे चित्र आहे. ही केंद्र खास करून 18 ते 44 वयोगटासाठी राखीव करण्यात आली आहेत.

शासनाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी यानंतर दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण सुरू केले होते. तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आले. तर 1 मे पासून कोणतीही तयारी नसताना केंद्र शासनाच्या आदेशानुसार 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

शासनाकडून कोवीशिल्ड तसेच कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी देण्यात येत आहेत. मात्र कोवीशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीनचे प्रमाण अत्यल्प आहे. यापुर्वी काही केंद्रांवर कोव्हॅक्सीनचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्यांनी पहिला डोस ज्या लसीचा घेतला त्यांना दुसरा डोसही त्याच लसीचा घेणे आवश्यक आहे.

पंरतु केंद्र व राज्य शासनाच्या कुरघोडीत राज्य शासनाकडून कोव्हॅक्सीन लस केवळ 18ते 44 वयोगटासाठी देण्याचे निर्देश दिल्याने गेली आठ दिवसांपासून पहिला डोस नंतर दुसर्‍या डोसचा कालावधी पुर्ण होऊन आठ दिवस होऊन गेले असतानाही त्यांना डोस मिळाला नाही.

याबाबत अनेक वृद्धांची वणवण सुरू असून कोणतेही शासकीय अधिकारी त्यांना उभे करत नसून शासनाच्या आदेशाचे कारण दिले जात असल्याने ते हवालदिल झाले आहेत. याबाबत स्थानिक पातळीवर काही लोक प्रतिनिधींनी आवाज उठवला असला तरी तो शासनापर्यंत पोहचत नसल्याने जिल्ह्यातील लाखोजणांचे लसीकरण वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे.

लसीकरण केलेच कशाला

एकिकडे करोनाचा उद्रेक सुरू असून लसींसाठी गर्दी होत असताना आता शासनाकडून योग्य तो पुरवठा होत नाही. आम्हाला पहिला डोस देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. आणि आता दुसरा डोसच मिळत नसल्याने पहिला डोस वाया जाण्याची भिती आहे. असे होणार असेल तर पहिलेच लसीकरण केले कशाला?

चंद्रकांत कुलकर्णी, नागरिक

लोकांना मारण्याचे धोरण

शासनाला लसीकरण करायचे आहे की केवळ लोकांचे हाल करून त्यांना मारायचे आहे हेच समजत नाही. केंद्र आणि राज्य शासनाचा मेळ बसत नसल्याचा फटका वृद्ध नागरिकांंना का दिला जात आहे. अशा करोना उद्रेकात लसीकरणाअभावी आता नागरिकांना मारण्याचे धोरण असल्याचे दिसते.

दीपक निफाडे, ज्येष्ठ नागरिक

शासनाचा मूर्खपणा

18 ते 44 वयोगटाला पहिला डोस देण्यासाठी शासन पहिला डोस दिला गेलेल्यांना लस देण्यास नकार देत असेल तर हा शासनाचा शुद्ध मुर्खपणा आहे. याच्या परिणामी दुसरा डोस न मिळाला त्यांनाही करोना होईल आणि युवकांनाही डोस पुरणार नाही यामुळे त्यांनाही कोरोना होईल, याला मुर्खपणाचा कळस म्हणावा लागेल.

अरूण ताम्हाणकर, नागरिक

दुसरा डोस उपब्ध करा

शासनाने पहिला डोस 45 तसेच 60 वर्षांवरील व्यक्तींना दिला आहे. रांगेमध्ये तासनतास उभे राहून पहिला डोस घेतल्यानंतर शासन आता दुसरा डोस उपलब्ध न करून नागरीकांची फसवणुक करत आहे. तर स्थानिक प्रशासन तो आदेश पुढे करत नागरीकांना लसीकरण केंद्रांवरून हाकलून देत आहे. लवकर दुसरा डोस उपलब्ध केला नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

अक्षय आहेर, मनसेना कार्यकर्ता

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com