Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याधान्य वितरणात त्रुटी; एफसीआय अधिकार्‍यांची खरडपट्टी

धान्य वितरणात त्रुटी; एफसीआय अधिकार्‍यांची खरडपट्टी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar )यांनी शहरात असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या धान्य साठवणूक गोडाऊनला ( Grain storage godown of Food Corporation of India)भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी धान्य वितरणातील त्रुटींवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली.

- Advertisement -

शहरात ब्रिटिश कालीन भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठविण्याचे गोडाऊन असून तब्बल 265 एकरावर असलेल्या एफसीआयमध्ये 32 सायलो आणि 125 पेक्षा जास्त गोडाऊन असून त्यात हजारो मेट्रीक टन धान्य साठवले जाते. पंजाब, हरियाणासह इतर राज्यातून रेल्वेद्वारे गहू आणि तांदूळ आणले जाते. त्यानंतर हे धान्य राज्यातील रेशन दुकानांवर पुरवठा केला जातो. मात्र एफसीआयमधून सुरळीतपणे धान्य पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी गोरगरीब गरजू नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत एक वर्षे मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन धान्याची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानांवर वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय त्यांना काही त्रुटी देखील आढळून आल्यामुळे त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरून त्यांची कानउघडणी करत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धान्याचे वितरण सुलभ आणि वेळेत करण्यात यावे त्यासाठी वितरणाचे योग्य नियोजन करून अन्न महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवत वितरणास गती द्यावी, अशा सूचना त्यांनी एफसीआयच्या अधिकार्‍यांना केल्या. यावेळी त्यांनी गोडाऊनमध्ये जाऊन धान्याच्या दर्जाची देखील तपासणी केली.

यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाकडून दरमहा 1500 मेट्रिक टन धान्याची मागणी केली जात असतांना फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन इतकाच पुरवठा का केला जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र अधिकार्‍यांना याबाबत व्यवस्थितपणे उत्तर देता आले नाही. त्यामुळे मंत्री भारती पवार यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत त्यांची कानउघडणी केली. पुढे असा प्रकार घडता कामा नये, अशी एका प्रकारे तंबी दिली.

यावेळी एफसीआयच्या विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, बापू शिंदे, संदीप नरवडे, एकनाथ बोडखे, कांतीलाल लुणावत, पंकज खताळ, नितीन परदेशी, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, आरपीआयचे दिनकर धीवर, कैलाश आहिरे, गुरुकुमार निकाळे यांच्यासह एफसीआय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या