अरेरे! पीपीई कीट घालून दोघा भावंडांनीच केले करोनाबाधित पित्यावर अंत्यसंस्कार

jalgaon-digital
2 Min Read

पुनदखोरे | वार्ताहर

कळवण तालुक्यातील अभोणा  येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले अभोण्यातील ज्येष्ठ नागरीक चिंतामण कामळस्कर (वय ७०) यांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला.

काल (दि २१) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चिंतामण कामळस्कर यांचा मृत्यू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केल्यानंतर कामळस्कर यांच्या मुुुलांंनी (महेेंद्र व विनय) यांनी ग्रामपंचायत प्रशासन प्रशासकीय अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली.

तसेच तात्काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची त्यांना विनंती केली. परंतु ते काम आमचे नाही तर आरोग्य विभागाचे आहे. आम्हाला तेवढेच काम आहे का? अशा प्रकारचे भाष्य करून ग्रामपंचायत प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली.

रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध न झाल्याने अखेरीस कामळस्कर बंधुंनी स्वतः पीपीई किट परिधान करून आपल्या  पित्यास रात्री उशिरा  अंत्यसंस्कार केले. यावेळी शासकीय वाहनदेखील उपलब्ध झाले नाही अखेरीत ट्रक्टर घेऊन पित्याचा मृतदेह या मुलांनी स्मशानभूमीत नेला.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुमारे १२ तास मृतदेह दवाखान्यात पडून असल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली होती व करोना आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती.

यामुळे दिवसभर दवाखान्यातील वातावरण सैरभर झालेले असल्याचे करोना रुग्णांकडून सांगण्यात आले. दरम्यान, एका महिन्याच्या  कालावधीत अभोणा गावातील ५ नागरीकांचा कोविड -१९ ने मृत्यू झाला असून  सुमारे तीस नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

गावबंद करणे यापलीकडे कोणत्याही योग्य उपाययोजना सार्वजनिक स्तरावर ग्रामपंचायतीने केलेल्या नसल्याचे दिसून आले आहे. अभोणा ग्रामपंचायतीने तात्काळ विद्युतदाहीनी उपलब्ध करून द्यावी , कामात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी व नियमित चांगल्या प्रशासकाची नेमणूक तालूका प्रशासनाकडून करण्यात यावी अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल खैरनार, के.के.कामळस्कर, मनोज कामळास्कर व  ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन ग्रामीण रुग्णालयाच्या आणि ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *