पावसाची हुलकावणी; बळीराजा हवालदिल

पावसाची हुलकावणी; बळीराजा हवालदिल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला मात्र, अद्याप पाऊसच (rain) नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी (farmers) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी (Kharif sowing) शेतकरी सज्ज झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत केवळ 1 टक्काच पेरणी झाली आहे.

18 जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे.75 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी (Agricultural experts) दिला आहे. पावसाने ओढ दिल्यानं बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून, पाऊस लांबल्यानं जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. एकीकडे हवामान खात्याकडून (Weather department) भाकितांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे राज्यभरात बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पहात

आहे. मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्र (maharashtra) व्यापल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आला, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे.

7 जूनपासून राज्यात मान्सून पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे जूनअखेर दरवर्षी जवळपास 54 लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने 17 जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. मागील वर्षी 17 जूनपर्यंत सरासरी 120.4 मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात 90 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com