पावसापुढे बळीराजा ठरला हतबल

शेतातील पाण्यामुळे पीके सडली; द्राक्षबागांची छाटणी लांबली
पावसापुढे बळीराजा ठरला हतबल

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी सुरुच असल्याने शेतात पाणी साचले.

मका, सोयाबीन, कांदा रोपे, भाजीपाला आदी पिके सडली असून अति पावसामुळे द्राक्षबागेच्या छाटण्या लांबल्या आहेत. त्यामुळे मोठा खर्च व मेहनत करुन हातात आलेली पिके वाया गेल्याने शेतकर्‍यांपुढीुल आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.

मागील वर्षापर्यंत पाऊस कोकण परिसरात धुव्वाधार बरसत होता. मात्र यावर्षी पावसाने बागायती तालुक्यात वक्रदृष्टी करीत पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सुरू केलेली हजेरी शेवटपर्यंत कायम ठेवली. सद्यस्थितीत तालुक्यात टोमॅटो हंगाम सुरू असून शेतात पाणी साचल्याने टोमॅटो काढणीस व्यत्यय येत असून फुलगळ व फळगळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

तसेच अति पावसामुळे द्राक्षेबागेची छाटणी लांबणीवर पडली असून चिखलामुळे औषधे फवारणीस अडचणी येत आहेत. तर लाल कांद्याची रोपे देखील अति पावसामुळे वाया गेली असून नदी नाल्याचे पाणी नांदूरमध्यमेश्वर पर्यंत येत असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन 6310 क्यूसेकचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे सारोळेखुर्द जवळील विनता नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने पिंपळगाव-लासलगाव मार्ग खंडीत झाला असून याच परिसरात शेततळे फुटले आहे.

खेडलेझुंगे परिसरात डाळींबाच्या बागांवर तेल्या, मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढून या बागा वाया जात आहेत. तालुक्यात पालखेड, पिंपळगाव, शिरवाडे वणी, रानवड, सावरगाव, रेडगाव, सारोळेखुर्द, खडकमाळेगाव, उगाव, वनसगाव, निफाड, दावचवाडी, चांदोरी, सायखेडा, करंजगाव, म्हाळसाकोरे, कोठूरे, नैताळे, लासलगाव, विंचूर, भरवस, गोंदेगाव, देवगाव, कानळद, खेडलेझुंगे, कोकणगाव, ओझर, सुकेणे, पिंपळस, खेरवाडी, चांदोरी, नांदूरमध्यमेश्वर, धारणगाव, गाजरवाडी, काथरगाव आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकर्‍यांची दाणादाण उडवून दिली आहे. अद्यापही शेतातून पाणी वाहत असल्याने शेतीमशागतीची कामे थांबली असून अति पावसामुळे उभी पिके सडू लागली आहेत.

देवगावला कांदा रोपासह सोयाबीनचे नुकसान

देवगाव परिसरात अति पावसामुळे येथील प्रदिप भास्कर बोचरे यांचे कांद्याचे रोपे पूर्णपणे वाया गेले तर सोयाबीन पिकात पाणी साचल्याने संपूर्ण पिक सडून गेले. बोचरे यांचेप्रमाणे शेकडो शेतकर्‍यांच्या हातात आलेले मका, सोयाबीन, टोमॅटो, कांदा रोपे वाया गेली असून ऊस शेतात पाणी साचल्याने उभा ऊस आडवा पडून तो पिवळा होऊ लागला आहे. द्राक्षबागेत पाणी साचल्याने द्राक्ष छाटणी व औषध फवारणीची कामे थांबली आहेत.

विनता नदीला प्रथमच महापूर

सततच्या पावसामुळे विनता नदीला प्रथमच महापूर आला होता. या पुराचे पाणी उगावसह खेडे गावात घुसल्याने अनेक व्यवसायिक व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे उगाव ते खेडे दरम्यानचा मार्ग बंद पडला होता. भविष्यात विनता नदीला पूर आल्यास हा मार्ग पुन्हा खंडीत होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी नव्याने पुलाचे काम करुन या पुलाला उंची द्यावी. तसेच नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधावी जेणेकरुन पुराचे पाणी गावात येऊन व्यवसायिकांचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही.

शेतीला आले तळ्याचे स्वरुप

सततच्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले असून उभी पीके अति पावसाने सडू लागली आहे. शेतकर्‍यांनी पिके उभे करण्यासाठी मेहनत घेऊन मोठा खर्च केला. मात्र पावसाने या शेतकर्‍यांची निराशा केली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत देऊन पुढील पीके उभी करण्यासाठी दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर

यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तामसवाडी, ब्राम्हणवाडे शिवारातील खारा नाला, तामसवाडी जवळील देवनदी, निफाड जवळील अचोला नाला, लासलगाव परिसरातील शिवनदी, खडकमाळेगाव-उगाव परिसरातील विनता नदी, पिंपळगाव-वडाळी शिवारातून वाहणारी कादवा नदी, गाजरवाडी शिवारातून वाहणारा लेंडी नाला, शिवडी परिसरातील सपूर्णाई नदी, नांदुर्डी परिसरातील करामाई या नद्यांना प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी आल्यने या पूराचे पाणी परिसरातील शेतात शिरुन जलमय झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com