शेतकरी-महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

बोरी-अंबेदरी धरणातून पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम सुरू
शेतकरी-महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बोरी-अंबेदरी धरणातून पाटकालव्याऐवजी जलवाहिनीद्वारे सिंचनास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या विरोधात दहिदी परिसरातील गावातील शेतकरी गत 47 दिवसांपासून धरणावर आंदोलन करत असताना पाटबंधारे विभागातर्फे पोलीस बंदोबस्तात अस्ताने-राजमाने शिवारातील टोकडे रस्त्यालगत पाटकालव्यात जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ केला गेला.

आंदोलनाकडे दुर्लक्ष करत योजनेचे काम सुरू केले गेल्याने संतप्त शेतकर्‍यांनी या कामास विरोध दर्शवला तर आंबेदरी धरणावर महिलांसह शेतकर्‍यांनी जलसमाधी घेण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत शेतकर्‍यांसह महिलांना ताब्यात घेत नंतर त्यांची समजूत घालत सुटका केली. यावेळी झालेल्या पळापळ, झटापटीत कल्पना राजेंद्र कचवे ही वृध्द महिला जखमी झाल्याने तिला तातडीने सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जलवाहिनीचे काम सुरू झाल्याने अस्ताने, झोडगेसह परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले तर दहिदीसह वनपट, टिंगरी, राजमाने या भागातील शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.47 दिवसांपासून धरणावर पाटकालव्याव्दारेच पाणी द्यावे या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शेतकरी हित जोपासणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे हे शेतकर्‍यांचा विरोध दुर्लक्ष करीत जलवाहिनी टाकण्याचा अट्टाहास करत आहेत.

यासाठी शेतकर्‍यांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे. मंत्री व अधिकारी ऐकत नसल्याने जलवाहिनी विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असे असतांना देखील आज पोलीस बळाचा वापर करत जलवाहिनी योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आंदोलक भुषण कचवे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com